राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय कार्यालय मंजूर
By Admin | Updated: December 17, 2015 01:40 IST2015-12-17T01:40:39+5:302015-12-17T01:40:39+5:30
गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघातून चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय कार्यालय मंजूर
गडचिरोलीत मिळाली जागा : अशोक नेतेंनी घेतली नितीन गडकरींची भेट
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघातून चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत. या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे, या उद्देशाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय गडचिरोली येथे सुरू व्हावे, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार ना. गडकरी यांनी गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय कार्यालय मंजूर केले आहे व तसे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागालाही देण्यात आले आहे. गडचिरोली येथे सध्य:स्थितीत असलेल्या जुन्या मार्ग प्रकल्प विभागात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे हे कार्यालय सुरू होणार आहे, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी लोकमतला दिली आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले. या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. मात्र सदर कार्यालय नागपूर येथे असल्याने या कामाला विलंब होत होता. कामाची गतीही संथ होती. याबाबत खा. अशोक नेते यांनी पत्र लिहून ना. गडकरी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर त्यांनी गडचिरोली येथे कार्यालय करण्याचा हिरवी झेंडी दिली, अशी माहिती खा. नेते यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
असे राहणार आहे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे
जिल्ह्यात ३६६.५० किमीचे पाच राष्ट्रीय महामार्ग निर्माण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६३, सिरोंचा-कालेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १६३ ला जोडणारा रस्ता गडचिरोली जिल्ह्यात सात किमी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (सी) साकोली-लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचापर्यंत जिल्ह्यात २६९ किमी शिवाय राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (डी) नागपूर-उमरेड-नागभिड-ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) ला जोडणारा रस्ता या व्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० करंजी-वणी-घुग्घुस-चंद्रपूर-मुल-सावली-गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-छत्तीसगड राज्याची सीमा जोडणारा रस्ता या व्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (डी) पासून उमरेड-भिसी-चिमूर-वरोरा ते चंद्रपूर-नागपूर या महामार्गाला जोडणारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले असून ब्रम्हपुरी ते वडसा-कुरखेडा-कोरची ते देवरी-आमगाव-गोंदियापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित २०१६ मध्ये या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळेल, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी दिली.