नगर पंचायतीत नवे सभापती विराजमान

By Admin | Updated: December 3, 2015 01:32 IST2015-12-03T01:32:14+5:302015-12-03T01:32:14+5:30

गडचिरोली जिल्ह्यात कोरची, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा व धानोरा या पाच नगर पंचायतीत बुधवारी चार विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या.

Nagar Panchayat new Speaker seats | नगर पंचायतीत नवे सभापती विराजमान

नगर पंचायतीत नवे सभापती विराजमान

बांधकाम समितीवर उपाध्यक्षांची वर्णी : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना सर्वांना मिळाली संधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कोरची, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा व धानोरा या पाच नगर पंचायतीत बुधवारी चार विषय समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. तसेच दोन स्विकृत सदस्यही निवडण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना या सर्वांना सभापतीपदावर संधी मिळाली.
अहेरी नगर पंचायतीत स्वच्छता, वैधक व आरोग्य समितीवर सभापती म्हणून भाजपचे नारायण सिडाम, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी भाजपच्या स्मिता येमुलवार, महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राकाँच्या अर्चना विरगोनवार व उपसभापतीपदी ममता पटवर्धन यांचे नामनिर्देशन पत्र आले होते. यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सभापतीपदाचा भार सोपविण्यात आला. तसेच अहेरी नगर पंचायतीवर स्विकृत सदस्य म्हणून भाजपच्या वतीने पत्रकार गिरीश मद्देर्लावार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नितीन दोंतुलवार यांची निवड करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे, प्रशासक सत्यनारायण सिलमवार यांनी काम पाहिले.
एटापल्ली नगर पंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राकाँच्या सगुना हिचामी, पाणीपुरवठा सभापतीपदी काँग्रेसचे जलेंद्र टिकले यांची निवड करण्यात आली. तर न. पं. चे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांच्याकडे आरोग्य व स्वच्छता समितीचा कार्यभार देण्यात आला. सहयोगी सदस्य म्हणून भाजपतर्फे विजय नल्लावार तर काँग्रेसतर्फे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव दुर्गे यांची एकमताने निवड करण्यात आली. अपक्ष नगरसेवक रेखा मोहुर्ले यांनी बांधकाम सभापती पदासाठी तर भाजपच्या सुनीता चांदेकर यांनी पाणीपुरवठा, अपक्ष किरण लेकामी यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु सर्व सदस्यांमध्ये एकमत होऊन नव्या सभापतींची निवड करण्यात आली. येथे पिठासीन अधिकारी म्हणून एस. पी. पडघन व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संपत खलाटे यांनी काम पाहिले.
मुलचेरा नगर पंचायतीच्या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी उपाध्यक्ष देवा रामदास चौधरी, बांधकाम सभापतीपदी दीपक शंकर परचाके, पाणीपुरवठा सभापतीपदी अल्का रवी मेहर, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी जास्वंदा पुंडलिक गोंगले यांची निवड करण्यात आली. तर स्विकृत सदस्य म्हणून अब्दुल लतीफ शेख व नीरज चापले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते म्हणून दीपक शंकर परचाके यांची निवड करण्यात आली.
धानोरा : नगर पंचायतीत बांधकाम सभापतीपदी उपाध्यक्ष ललीत बरच्छा यांची निवड करण्यात आली. तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून मंगला जनार्धन मडावी यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. उपसभापती म्हणून भाजपच्या गीता वालको यांची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. आरोग्य सभापती सदाशिव येरमे हे निवडून आले. तर पाणीपुरवठा जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी गणपत विश्वनाथ गुरनुले हे अविरोध निवडून आले आहेत. स्विकृत सदस्य म्हणून समीर कुरेशी व गजानन साळवे यांची निवड करण्यात आली.
कोरची येथे नगर पंचायतीचे उपाध्यक्ष कमल खंडेलवाल यांच्याकडे बांधकाम सभापतीपदाचा भार सोपविण्यात आला आहे. तर स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून नीलकमल मोहुर्ले, पाणीपुरवठा सभापती म्हणून निराशा गावतुरे, महिला व बालकल्याण सभापती म्हणून असवंती सोनार यांची निवड करण्यात आली आहे. नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेकडून घनश्याम अग्रवाल तर काँग्रेसकडून मनोज अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पाच नगर पंचायतीत नगराध्यक्षपद मिळालेल्या पक्षाला यश आले आहे. (लोकमत वृत्तसेवा)

Web Title: Nagar Panchayat new Speaker seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.