मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:50 IST2017-08-25T23:49:27+5:302017-08-25T23:50:32+5:30
जिल्हा विभाजनापूर्वी जनपदच्या काळात आरमोरी तालुक्यातील मानापूर-देलनावाडी परिसरातील मुस्का-भाकरोंडी या रस्त्याची मुरूम, गिट्टी टाकून निर्मिती करण्यात आली.

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
मानापूर/देलनवाडी : जिल्हा विभाजनापूर्वी जनपदच्या काळात आरमोरी तालुक्यातील मानापूर-देलनावाडी परिसरातील मुस्का-भाकरोंडी या रस्त्याची मुरूम, गिट्टी टाकून निर्मिती करण्यात आली. त्यानंतर सात वर्षांपूर्वी या मार्गाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे वर्षभरातच या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले. तेव्हापासून मुस्का-भाकरोंडी मार्ग आजही दुरवस्थेत आहे. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मुस्का परिसरातील तळेगाव, खांबाळा, भाकरोंडी, नवेगाव, सालेभट्टी, बांधोना, नवतळा आदींसह १५ गावातील नागरिक या मार्गाने आवागमन करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. सदर मार्गावरील डांबरीकरण व गिट्टी पूर्णत: उखडली आहे. खांबाळा, मुस्कापासूनचे वाहनधारक व प्रवासी भाकरोंडी येथे येतात. येथून धानोरा, गडचिरोली तर काही जण आरमोरीकडे जातात. आठवडी बाजार, शिक्षणाच्या सोयी, पोलीस ठाण्यातील काम आदींसह विविध कामांसाठी या १५ गावातील नागरिक याच मार्गाने सोयीचा मार्ग म्हणून ये-जा करतात. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही या मार्गाने धावतात. मुस्का-भाकरोंडी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आजवर अनेकदा या मार्गावर अपघात घडले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहने सातत्याने पंक्चर होत आहेत. मुस्का-भाकरोंडी मार्गाची इतर प्रचंड दुरवस्था होऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी व कर्मचाºयांनी एकदाही येऊन पाहणी केली नाही.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या परिसराचा कोणीच वाली नाही, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तत्काळ मुस्का-भाकरोंडी रस्त्याची पक्की दुरूस्ती करावी, येथे नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रपटा वाहून गेला
खोब्रागडी नदीवर काही वर्षांपूर्वी पुलाचे काम अर्धवट स्थितीत झाले. रस्त्यालगतच्या नाल्याच्या वेगवान पाणी प्रवाहामुळे काही ठिकाणचा डांबरी रस्ता पूर्णत: वाहून गेला. नाल्यातील पाणी सहजतेने वाहून जावे, वाहतूक प्रभावित होऊ नये, यासाठी मुस्का-भाकरोंडी मार्गावरील नाल्यावर सिमेंट काँक्रिटच्या पायल्या टाकून रपटा तयार करण्यात आला. मात्र सदर रपट्याचे काम योग्यरित्या न झाल्याने रपटा पूर्णत: वाहून गेला. त्यामुळे सिमेंट काँक्रिटच्या पायल्या स्पष्टपणे दिसत आहेत. या ठिकाणी नव्याने पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.