परिस्थितीवर मात करीत संगीता झाली डॉक्टर
By Admin | Updated: September 6, 2015 01:21 IST2015-09-06T01:21:03+5:302015-09-06T01:21:03+5:30
ज्या गाव परिसरात आरोग्याच्या सुविधा नाहीत, प्रसूतीसाठी महिलेला रूग्णालयात नेण्यासाठी वाहनही गावांमध्ये जाऊ शकत नाही, अशा गावातून बैलबंडीवर महिलांना प्रसूतिगृहापर्यंत आणावे लागते,

परिस्थितीवर मात करीत संगीता झाली डॉक्टर
गरिबांना सेवा देण्याचा व्यक्त केला मानस : उज्ज्वल यशाने पंचक्रोशी उजळली
संजय गज्जलवार जिमलगट्टा
ज्या गाव परिसरात आरोग्याच्या सुविधा नाहीत, प्रसूतीसाठी महिलेला रूग्णालयात नेण्यासाठी वाहनही गावांमध्ये जाऊ शकत नाही, अशा गावातून बैलबंडीवर महिलांना प्रसूतिगृहापर्यंत आणावे लागते, अशा परिस्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या संगीता रामचंद्र मेडी या विद्यार्थिनीने शालेय शिक्षणापासूनच वैद्यकीय सेवेकडे जाण्याचा निश्चय केला होता. अतिशय विपरित आर्थिक परिस्थितीत वैद्यकीय शाखेचे शिक्षण संगीताने पूर्ण केले व आता ती स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून या भागातील ४० गावांना आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. संगीताच्या या यशाने जिमलगट्टातील तिची चंद्रमौली झोपडी उजळून निघाली आहे.
अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर नक्षली सावटात सदैव राहणारा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिमलगट्टा गावात संगीता मेडी हिचे बालपण गेले. वडील रामचंद्र मेडी जिमलगट्टा येथील वन विभागात वनमजूर म्हणून काम करीत आहेत. संगीता शालेय शिक्षणापासूनच हुशार असल्याने तिच्या शिक्षणाची आबाळ वडिलांनी होऊ दिली नाही. दहावीपर्यंतचे संगीताचे शिक्षण राणी दुर्गावती शाळा आलापल्ली येथे पूर्ण झाले. त्यानंतर विज्ञान शाखेत अकरावी, बारावीचे शिक्षण घेण्यासाठी संगीताने गडचिरोली गाठले. येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून तिने बारावीचे शिक्षण ८० टक्के गुण घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ती बीएएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नागपुरात दाखल झाली. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतले. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आता ही आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. जिमलगट्टा परिसरातील ३० ते ४० गावातून वैद्यकीय शिक्षण घेणारी ती पहिली महिला डॉक्टर ठरली आहे. बीएएमएसनंतर एमडी करण्यासाठी आता ती मुंबईला जाणार आहे. हे सारे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पैशाच्या मागे न धावता आपल्याच भागातील सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण काम करणार आहो, असे तिने लोकमतशी बोलताना सांगितले.
संगीता बीएएमएस अभ्यासक्रम पूर्ण झाली ही माहिती वडिलांनी काही नागरिकांना दिल्यानंतर संगीताच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले. विपरित परिस्थितीत संगीताने हे शिक्षण पूर्ण केले. याबद्दल पंचक्रोशीतूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्या भागात लोकांमध्ये आरोग्याविषयी फार जागरूकता नाही, अशा भागात काम करून त्या भागातील लोकांना चांगली दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आपण संपूर्ण काळ काम करणार असल्याचे संगीताने सांगितले. आपल्या यशात आई-वडील, कुटुंबीय व गुरूजणांचे मोलाचे सहकार्य असल्याचे ती म्हणाली.