नगर पालिकेचा पाच लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर
By Admin | Updated: March 18, 2015 01:41 IST2015-03-18T01:41:48+5:302015-03-18T01:41:48+5:30
शहराचा विकास करण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन नियोजन व विकास आराखडा दरवर्षी निश्चित करीत असते.

नगर पालिकेचा पाच लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर
गडचिरोली : शहराचा विकास करण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन नियोजन व विकास आराखडा दरवर्षी निश्चित करीत असते. नगर परिषदेचा सन २०१५-१६ या वर्षाचा पाच लाख १९ हजार ७३० रूपयांचा शिल्लकी अंदाजपत्रक २७ फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निर्मला मडके होत्या. गडचिरोली नगर परिषदेला दर व कराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत असते. शासन अनुदान, अंशदान, इतर अनुदान, गुठेवारी व बांधकाम विकास निधीच्या माध्यमातून नगर परिषदेला कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळत असते. सन २०१५-१६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात नगर परिषदेला एकूण ४२ कोटी ४३ लाख १७ हजार ७३० रूपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या उत्पन्नातून आस्थापना व सर्व विकासात्मक बाबींवर ४२ कोटी ३७ लक्ष ९८ हजार रूपयाचा खर्च होणार आहे. नगर परिषदेच्या वार्षीक एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता पाच लाख १९ हजार ७३० रूपयें वर्षाच्या अखेरीस शिल्लक राहणार असल्याचे नगर परिषदेच्या अंदाजपत्रकावरून स्पष्ट होते.
कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट मिळणार
स्थानिक नगर परिषद प्रशासनाने यंदा प्रथमच अंदाजपत्रकात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट खरेदी करून वाटप करण्यासाठी दोन लाख रूपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना गणवेश व रेनकोट मिळण्याची शक्यता आहे.
दफनभूमी व स्मशानभूमीसाठी दीड कोटी
दफनभूमीमध्ये पायऱ्याच्या बांधकाम करण्यासाठी ५० लाख रूपये तसेच स्मशानभूमी विकसित करण्यासाठी एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोंडवाडा व अंगणवाडीच्या विकासासाठी बारा लाख
शहरात नवे कोंडवाड्याचे बांधकाम तसेच जुन्या कोंडवाड्याच्या दुरूस्तीसाठी दोन लक्ष रूपये तर शहरात अंगणवाडी केंद्र बांधण्यासाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रकाश पाडण्यासाठी ५० लाख
शहरातील पथदिवे दुरूस्ती व इतर वस्तू खरेदीकरिता ५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून शहरात उजेड पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)