पालिकेने हटविले पक्के अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 01:16 IST2018-02-11T01:13:31+5:302018-02-11T01:16:21+5:30
स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन स्मशानघाट मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले.

पालिकेने हटविले पक्के अतिक्रमण
ऑनलाईन लोकमत
देसाईगंज : स्थानिक नगर पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेऊन स्मशानघाट मार्गावरील अवैध अतिक्रमण हटविण्याचे आदेश काढले. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या पथकाने या भागातील पक्के बांधकाम जेसीबीने पाडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पार पाडली.
देसाईगंज येथील स्मशानघाट मार्गावर विर्शी तुकुम सर्वे क्रमांक ४३७/१ अ जमिनीचे मालक ब्रह्मपुरी येथील डॉ. अभयसिंग शंकरसिंग रघुवंशी व डॉ. भारत देवीदास गणवीर हे आहेत. आपल्या शेतात ये-जा करणाऱ्या मार्गावर सर्वे क्र. ४३६/१/२ या लेआऊट मधील १२ मीटरच्या रोड वर अवैधरित्या अतिक्रमण करुन बांधकाम केले जात असल्याची शेतजमीन मालकांनी पालिकेकडे तक्रार केली होती. नगर परिषदेने सदर जागेवरील अतिक्रमण हटविण्याबाबत हाजी मो. हनीफ सत्तार जादा यांना २४ जानेवारी रोजी नोटीस बजावली. मात्र हाजी मो. हनीफ सत्तार जादाने सदर जागा व सुरु असलेले बांधकाम त्यांच्या मालकीचे नसल्याचे नोटीसवर लिहून दिले. त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारला जेसीबीच्या सहाय्याने चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले.
सदर कार्यवाही मुख्याधिकारी मुलानी यांच्या आदेशाने न.प. कर्मचारी हमीद पठान, उदय सोनेकर व इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. न.प.ने आता शहरातील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, पालिकेने काढलेले हे अतिक्रमण नेमक्या कोणत्या व्यक्तीचे आहे व बांधकाम कोणी केले आहे. हे याबाबतची माहिती कळू शकली नाही.