युवक काँग्रेसचे मुंडण आंदोलन

By Admin | Updated: August 17, 2015 01:03 IST2015-08-17T01:03:55+5:302015-08-17T01:03:55+5:30

गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ....

Munda movement of Youth Congress | युवक काँग्रेसचे मुंडण आंदोलन

युवक काँग्रेसचे मुंडण आंदोलन

गडचिरोली : गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, यासह विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट न दिल्याने युकाँ कार्यकर्त्यांनी मुंडन करुन अम्ब्रीशराव आत्राम व राज्य सरकारचा निषेध नोंदविला.
राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अधिसूचना काढून गडचिरोली जिल्हयातील आदिवासींना नोकरभरतीत प्राधान्य दिले आहे. यामुळे गैरआदिवासी समाजातील युवक,युवती नोकरभरतीपासून वंचित राहत आहेत. या अधिसूचनेत सुधारणा करावी, जिल्हा निवड मंडळ स्थापन करुन वर्ग ३ व ४ ची सर्व पदे स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षित ठेवावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जिल्ह्यातील पोलिस भरतीत स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य द्यावे जातनिहाय जनगणना तत्काळ करावी आदीसह विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ९ आॅगस्टपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, १५ आॅगस्टला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे गडचिरोलीत होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी, अशी उपोषणकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु पालकमंत्र्यांनी उपोषणमंडपाकडे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन पालकमंत्री आत्राम व गैरआदिवासींच्या प्रश्नांकडे डोळेझाक करीत असलेल्या राज्य सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व सरकारविरोधात जोरदार नारेबाजीही केली.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे, सुमंत मोहितकर, अमोल भडांगे, नीतेश राठोड, गौरव अलाम, नीलेश बाळेकरमकर, जितू ठाकरे आदींनी मुंडन करुन पालकमंत्री व सरकारचा निषेध केला. याप्रसंगी रवींद्र दरेकर, सतीश विधाते, सुदाम मोटवानी, लता पेदापल्ली, नंदू वाईलकर, सुनील डोगरा, अतुल मल्लेलवार, आशिष कन्नमवार, प्रतीक बारसिंगे, मिलिंद खोब्रागडे, मनीष डोंगरे, सर्वेश पोपट, गावतुरे, आकाश बघेल, हेमंत मोहितकर, सुमीत बारई, प्रवीण मुक्तावरम, राकेश गणवीर उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जनताच भाजप लोकप्रतिनिधींना धडा शिकविणार
याप्रसंगी उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सत्तेत आल्यास ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करु व राज्यपालांची अधिसूचना रद्द करु, असे आश्वासन देऊन भाजपाने सत्ता मिळविली. परंतु आता त्यांची भाषा बदलली आहे. भाजप नेते भूलथापा देत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न न सोडविल्यास जनताच भाजपच्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देतील, असा इशाराही रवींद्र दरेकर यांनी दिला.

Web Title: Munda movement of Youth Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.