परीक्षेसाठी मुंबईची वारी
By Admin | Updated: July 8, 2017 01:07 IST2017-07-08T01:07:58+5:302017-07-08T01:07:58+5:30
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जात असलेल्या पुरवठा निरिक्षक या पदासाठी अनेक जिल्ह्यांना विभागीय स्तरावरील ठिकाण हे परीक्षा केंद्र दिले आहे.

परीक्षेसाठी मुंबईची वारी
पुरवठा निरीक्षकपदाची परीक्षा : गडचिरोली व चंद्रपूरसाठी दिले मुंबईचे केंद्र!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जात असलेल्या पुरवठा निरिक्षक या पदासाठी अनेक जिल्ह्यांना विभागीय स्तरावरील ठिकाण हे परीक्षा केंद्र दिले आहे. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना मुंबई येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. अनेक गरीब उमेदवार मुंबईला जाण्याचा खर्च करू शकणार नसल्यामुळे सदर उमेदवार परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर परीक्षा केंद्र रद्द करून नागपूर विभागातीलच परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
नागपूर आयुक्त कार्यालयाने २४ मे रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून पुरवठा निरिक्षक या पदासाठी अर्ज मागविले होते. जाहिरातीनुसार परीक्षा केंद्र विभागीयस्तरावर निश्चित करण्यात आले होते व परीक्षार्थी अधिक झाल्यास सदर परीक्षा केंद्र जिल्हास्तरावर घेण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. जाहिरातीतील अटी व शर्तींची पूर्तता करून गडचिरोली जिल्ह्यातील दीड हजाराहून अधिक परीक्षार्थींनी या पदासाठी अर्ज केले आहेत. या पदाची परीक्षा २३ जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाने प्रसिध्दी पत्रक प्रकाशित केले असून त्यामध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुंबई येथे परीक्षा केंद्र दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर मुंबई व गडचिरोली जिल्हे आहेत.
दोन दिवस अगोदर निघून दोन दिवसानंतर सदर विद्यार्थी आपल्या गावी परतणार आहेत. परीक्षेच्या एक दिवस अगोदर मुंबई येथे पोहोचल्याने तेथील लॉजचा खर्चही विद्यार्थ्याला करावा लागणार आहे. येथील गरीब विद्यार्थी कसेतरी आवेदनपत्र भरतात. त्यातही आता मुंबई येथे जाण्याचा खर्च करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मुंबई येथे जाऊन परीक्षाच देऊ शकणार नाही.
विशेष म्हणजे गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील युवकांची त्यांच्याच विभागस्तरावर परीक्षा ठेवली आहे. मग गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांवरच हा अन्याय का? असा सवाल बेरोजगारांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून हे परीक्षा केंद्र रद्द करावे, अशी मागणी युवकांनी केली आहे. निवेदन देतेवेळी संतोष बोलुवार, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, भास्कर बुर्रे, भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे आदी उपस्थित होते.
शिक्षक पात्रता परीक्षेनेही गोंधळ
२३ जुलै रोजी पुरवठा निरिक्षक पदासाठी परीक्षा ठेवण्यात आली आहे. तत्पूर्वी २२ जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा ठेवली आहे. याही परीक्षेला जिल्ह्यातून हजारो उमेदवार बसले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा देऊन त्याच दिवशी मुंबईला पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे अनेक युवक दोन पैकी एकच परीक्षा देऊ शकणार आहेत. खर्चामुळे पुरवठा निरिक्षक पदाच्या परीक्षेपासूनच उमेदवार वंचित राहण्याची शक्यता आहे. नोकरीच्या दृष्टीने पुरवठा निरिक्षक पदाची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या परीक्षेचे केंद्र बदलविण्याची मागणी आहे.