कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 05:55 PM2022-06-23T17:55:46+5:302022-06-23T17:57:26+5:30

याशिवाय कार्यालयीन कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त आहे. याठिकाणी पूर्णवेळ अभियंत्यांची पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

MSEDCL service in Korchi taluka Rambharose; no Junior Engineer or Deputy Executive Engineer appointed from 4 years | कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही

कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही

Next

कोरची (गडचिरोली) : येथील ३३ केव्ही सबस्टेशन असलेल्या वीज वितरण कंपनीमध्ये मागील सहा वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, तर चार वर्षांपासून उपकार्यकारी अभियंता ही पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत तालुक्यातील वीजपुरवठ्याची सेवा रामभरोसे झाली आहे. या पदांची तालुक्यात गरज नाही का? आणि असेल तर ती पदे भरली का जात नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

येथील महावितरणचा कारभार केवळ एका अभियंत्यावर अवलंबून आहे. कार्यालयातील अनेक कामे व फील्डवरील कामे वेळेवर होत नसल्याने अनियमित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे कोरची तालुक्यातील ग्राहकांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरची येथील उपकार्यकारी अभियंत्याचा पदभार सध्या कुरखेडा येथील उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे आहे. याशिवाय कार्यालयीन कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त आहे. याठिकाणी पूर्णवेळ अभियंत्यांची पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी देवरी- चिचगडकडून आलेला वीजपुरवठा सुरळीत राहत होता; परंतु देवरी येथे स्टील कारखाना सुरू झाल्यामुळे कोरचीतील वीजपुरवठा बंद करण्यात आला. कुरखेडावरून आलेली वीजपुरवठ्याची लाइन नऊ किमी जंगलातून आहे. त्यामुळे एकदा वीज खंडित झाली की, २४ तासांच्या आत ती सुरू होत नाही. अशा आणीबाणीच्या वेळी चिचगडवरून वीजपुरवठा करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे, तरीही चिचगडवरून वीजपुरवठा दिला जात नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत.

देखभाल-दुरुस्तीचा निधी गडप?

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून झाडांची कटाई, देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यासाठी महावितरण लाखो रुपये खर्च करीत असते. तरीही थोडा वादळ-वारा आला तरीही वीजपुरवठा बंद केला जातो. जर वीजवाहक तारांची देखभाल दुरुस्ती आधीच केली जाते, तर वीजपुरवठा बंद करण्याची गरज काय? की त्याच्या नावाखाली कंत्राटदार व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार तर करत नाहीत ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांचे सरकारी उत्तर

या समस्यांबाबत गडचिरोली परिमंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र घाडगे यांना संपर्क केला असता ते म्हणाले की, रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. सध्या ३० जूनपर्यंत कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीवर स्थगिती आहे. लवकरच बाकी समस्या सुटतील. यासह कुरखेडा उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कोरची उपविभागाचा प्रभार दिला असून त्यांना सदर कामे करण्यास सांगितले आहे, असही ते म्हणाले. 

महिन्याला ३५ ते ४० लाखांचा महसूल

दर महिन्याला कोरची तालुक्यांतील वीज ग्राहकांकडून २० ते २५ लाख रुपये तर एबीस कंपनीकडून १२ लाख रुपये असे एकूण ३५ ते ४० लाख रुपयापर्यंतचे वीज बिल तालुक्यातील वीज ग्राहक दर महिन्याला भरतात. असे असताना ग्राहकांना नियमित वीज पुरवठा मात्र मिळत नाही. अनियमित वीज वसुली मात्र पूर्ण केली जाते. ही एकप्रकारे लूटच असल्याची भावना ग्राहकांमध्ये बळावत आहे.

Web Title: MSEDCL service in Korchi taluka Rambharose; no Junior Engineer or Deputy Executive Engineer appointed from 4 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.