प्रलंबित प्रश्नांवर खासदार रेल्वेमंत्र्यांना भेटले
By Admin | Updated: December 6, 2014 01:30 IST2014-12-06T01:30:05+5:302014-12-06T01:30:05+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

प्रलंबित प्रश्नांवर खासदार रेल्वेमंत्र्यांना भेटले
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. यावेळी मंत्र्यांनी नक्षलग्रस्त भागातील या लोकसभा मतदार संघात रेल्वेचे जाळे पसरविण्यासंदर्भात प्रथम प्राधान्य दिले जाईल. तसेच वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे.
३ डिसेंबर रोजी अशोक नेते यांनी सुरेश प्रभू यांची भेट घेतली. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाला निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले आहे. याशिवाय वडसा रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसचा थांबा व बिलासपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या नियमित थांब्यालाही मंजुरी देणार असल्याचे सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथेही बिलासपूर-चेन्नई एक्सप्रेसचा थांबा देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. वडसा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभिड तसेच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या रेल्वे स्थानकांवर सुपर एक्सप्रेस गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांना त्रास होतो. ही बाब रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
ब्रह्मपुरी येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मची उंची वाढविण्यासोबतच सिंदेवाही रेल्वेस्थानकावर फूट ओव्हर ब्रिजची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व बाबीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहे. नेते यांनी १९ जून २०१४ ला नागभिड येथे बैठक घेऊन रेल्वेशी संबंधीत प्रश्न दक्षिण-पूर्व मध्यरेल्वे नागपूर व बिलासपूर झोनच्या अधिकाऱ्यांनाही निदर्शनास आणून दिल्या होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)