ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन
By Admin | Updated: August 11, 2016 01:29 IST2016-08-11T01:29:35+5:302016-08-11T01:29:35+5:30
ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून सदर कामे ई-निविदा प्रक्रियेतून करण्यात यावी,....

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन
प्रमुख मागणी : ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून ती ई-निविदा प्रक्रियेतून करा
गडचिरोली : ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून सदर कामे ई-निविदा प्रक्रियेतून करण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातून शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन सीईओंना देण्यात आले.
या धरणे आंदोलनात ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा गडचिरोलीचे अध्यक्ष डी. एस. फुलझेले, उपाध्यक्ष आर. व्ही. गंजेवार, महिला उपाध्यक्ष व्ही. एस. वाढई, कोषाध्यक्ष के. जी. नेवारे, सरचिटणीस पी. बी. भांडेकर, पी. सी. बनपुरकर, व्ही. एम. पत्रे, ए. एस. कासर्लावार, एन. डी. धानोरकर, एस. जी. कुनघाडकर, के. के. कुलसंगे, बी. डी. चौधरी आदी पदाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील अनेक ग्रामसेवक सहभागी झाले होते.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांना ग्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये संघटनेने म्हटले आहे की, ग्रामपंचायतीकडे दिवसेंदिवस अनेक योजनांचा व्याप वाढत आहे. मनेरगा, १४ वा वित्त आयोग, ५ टक्के निधी, दलित वस्ती, तांडा वस्ती, नक्षल गावबंदी, वृक्षलागवड, जिल्हा वार्षिक योजना, जि. प. च्या विविध योजना व पाणीपुरवठा योजनेतून लाखो रूपयांची बांधकामे ग्रामपंचायतीच्या नावे देऊन सदर कामे कंत्राटदारामार्फत केली जातात. त्यामुळे ग्रामसेवकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. ग्रामसेवक हा तांत्रिक कर्मचारी नसल्याने तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी ग्रामसेवकांवर मानसिक ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांकडील बांधकामे कमी करून ती ई-निविदा प्रक्रियेतून करावी, ग्राम विस्तार अधिकारी डी. झेड. पिल्लारे यांना सेवेत घेण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)