वसतिगृहात समस्यांचा डोंगर
By Admin | Updated: July 7, 2014 23:35 IST2014-07-07T23:35:28+5:302014-07-07T23:35:28+5:30
शिक्षणासह विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही.

वसतिगृहात समस्यांचा डोंगर
समूह निवासी शाळेत : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शिक्षणासह विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. ही बाब अनेकदा उघडकीस आली आहे. एटापल्ली येथील समूह निवासी शाळेच्या वसतिगृहाची दूरवस्था झाली असून अनेक ठिकाणी घाण पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वसतिगृहाच्या दूरवस्थेमुळे प्रशासनाचा बेजबाबदारपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
एटापल्ली येथील समूह निवासी वसतिगृहात इयत्ता १ ली ते ७ पर्यंतचे विद्यार्थी निवासासह शिक्षण घेत आहेत. परंतु प्रशासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या अनेक सोयीसुविधांचा नेहमीच वसतिगृहात अभाव राहिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांना मुबलक सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. शिवाय वसतिगृहाची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे वसतिगृह परिसरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नियमित पाऊस सुरू झाल्यास रोगांची साथ पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. वसतिगृहात सुविधा पुरविण्याबाबत तसेच दूरवस्थेबाबत पं.स. सदस्य संजय चरडुके यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन वसतिगृहातील समस्या मांडल्या. त्यानंतर संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी वसतिगृहाला भेट दिली व पाहणी केली. समूह निवासी शाळेच्या वसतिगृहात नवीन सुविधांसह पलंगांची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे. मात्र अजुनपर्यंत जिल्हा परिषदेने पलंगांचा पुरवठा केला नाही, असे संवर्ग विकास अधिकारी लुटे यांनी वसतिगृह भेटी दरम्यान सांगितले.
वसतिगृहाची झालेली दूरवस्था व वसतिगृहात असलेला सोयीसुविधांचा अभाव प्रशासनाने लक्ष घालून दूर करावा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संपूर्ण सुविधा पुरवाव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पं. स. सदस्य संजय चरडुके यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)