पोलिसांच्या पुढाकाराने माता-पुत्राचे मिलन

By Admin | Updated: March 24, 2015 01:52 IST2015-03-24T01:52:18+5:302015-03-24T01:52:18+5:30

एक महिन्यापूर्वी कुरखेडा तालुक्यातील राजोलीला मुुलीच्या घरी येण्यासाठी निघालेली

Mother's son's meeting with the initiative of the police | पोलिसांच्या पुढाकाराने माता-पुत्राचे मिलन

पोलिसांच्या पुढाकाराने माता-पुत्राचे मिलन

मालेवाडा : एक महिन्यापूर्वी कुरखेडा तालुक्यातील राजोलीला मुुलीच्या घरी येण्यासाठी निघालेली चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील जांभुळघाटची ६० वर्षीय वृध्द महिला परत जाताना जांभुळघाटला पोहोचली नाही. दरम्यान ती भटकत राहिली. मात्र चरवीदंड येथील युवकाला ही महिला आढळली. त्यांनी मालेवाडा पोलीस मदत केंद्राला याची माहिती दिली. मालेवाडा पोलिसांच्या पुढाकाराने महिलेला तिच्या मुलाकडे पोहोचवून देण्यात आले. तब्बल एक महिन्यानंतर मुलाचे व आईचे मिलन झाले.
चिमूर तालुक्यातील जांभुळघाट येथील बयाबाई चंद्रभान उईके (६०) ही महिला जांभुळघाटवरून मुलीच्या घरी राजोली येथे जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती परत आली नाही. तिची एक महिन्यापासून सर्वत्र शोधाशोध सुरू होती. १५ मार्च २०१५ रोजी मालेवाडा नजीकच्या चरवीदंड येथे ही महिला रतन जीवन कुमरे व मुकेश नरोटे या दोघांना दिसली. त्यांनी या महिलेला मालेवाडा पोलीस मदत केंद्रात आणून सोडले. मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सुधीर कटारे, उपनिरिक्षक अजित कनसे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस शिपाई प्रिती बरडे, सुमैय्या शेख, महिला पोलीस हवालदार मसराम, शिपाई संगिता नैताम, किरंगे यांनी या वयोवृध्द महिलेची विचारपूस करून हिच्याकडून कुटुंबाची माहिती घेतली. दरम्यान नरेश चंद्रभान उईके (४५) हा तिचा मुलगा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी जांभुळघाट येथील शंकर कान्हुजी देव्हारे यांच्या भ्रमणध्वनीवरून भिसी पोलीस ठाण्यास माहिती दिली. एक महिन्यानंतर मुलगा नरेश उईके व आई बयाबाई यांचे मनोमिलन झाले. पोलिसांनी पुढाकार घेतल्याने माता-पूत्राची भेट होऊ शकली. दोघांच्याही मनोमिलनचा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून पोलीस परती निघाले. (वार्ताहर)

Web Title: Mother's son's meeting with the initiative of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.