सासू व पत्नीनेच काढला पोलीस जवानाचा काटा
By Admin | Updated: July 3, 2017 01:11 IST2017-07-03T01:11:07+5:302017-07-03T01:11:07+5:30
धानोरा तालुक्यातील सायगाव येथे विषारी दारू पिल्याने पोलीस जवानासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी घडली होती.

सासू व पत्नीनेच काढला पोलीस जवानाचा काटा
सायगाव येथील प्रकरण : विषारी दारूच्या बळीचा केला देखावा
ंलोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सायगाव येथे विषारी दारू पिल्याने पोलीस जवानासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १८ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणाच्या अगदी खोलवर जाऊन मालेवाडा पोलिसांनी तपास केला असता, पोलीस जवानाची पत्नी, सासू व पत्नीचा प्रियकर या तिघांनी दारूमध्ये कीटकनाशक टाकून जवानाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते तुरूंगाची हवा खात आहेत.
लता करंगामी (३५) रा. नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली, शांताबाई सुंदरशाह मडकाम (५५) रा. सायगाव, ईशांत निखार (२९) रा. नवेगाव कॉम्प्लेक्स गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. तुळशिराम करंगामी याची गडचिरोली पोलीस मुख्यालयात नोकरी होती व तो नवेगाव कॉम्प्लेक्स येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. तुळशिरामची पत्नी लता करंगामी हिचे नवेगाव कॉम्प्लेक्स येथीलच ईशांत निखार या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब तुळशिरामला माहीत झाल्यानंतर तो नेहमी मारहान करीत होता.
१८ मार्च रोजी धानोरा तालुक्यातील सायगाव येथे लता करंगामी हिच्या भावाच्या घरी नामकरणविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुळशिराम हा त्याची पत्नी व मुलांसह गेला होता. तत्पूर्वी लता, तिचा प्रियकर ईशांत व तुळशिरामची सासू शांताबाई मडकाम यांनी कट रचून तुळशिरामच्या दारूमध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने कीटकनाशक मिसळविले. सदर दारू तुळशिरामला पिण्यास दिली. तुळशिरामने ही दारू गावातीलच उमेश मडकाम व जितेंद्र दुग्गा यांच्यासोबत वाटून घेतली. दारू प्राशन केल्यानंतर उमेश मडकाम व जितेंद्र दुग्गा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तुळशिराम करंगामी मात्र यातून बचावला.
ही बाब उमेश मडकामचे भाऊ रमेश बेडूजी मडकाम व दिनेश बेडूजी मडकाम यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी तुळशिरामला बेदम मारहान केली. या मारहानीत तुळशिरामचा मृत्यू झाला. रमेश व दिनेशच्या मारहानीमुळे तुळशिरामचा मृत्यू झाल्याची तक्रार लता हिने मालेवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला रमेश मडकाम व दिनेश मडकाम या दोघांना अटक केली. मात्र तुळशिरामला मारण्यात त्याची पत्नी, सासू व त्याच्या पत्नीच्या प्रियकराचा हात असल्याची गोपनीय माहिती मालेवाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार लता करंगामी, ईशांत निखार व शांताबाई मडकाम यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, त्यांनी तुळशिरामच्या दारूमध्ये कीटकनाशक मिसळविल्याचे मान्य केले. त्यानंतर या तिघांवरही मालेवाडा पोलीस मदत केंद्रात कलम ३०२, ३२८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला व १८ जून रोजी अटक केली. २९ जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. २९ जूननंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अजित कनसे व दीपक वारे यांनी केला.
इंजेक्शनने दारूत मिसळविले कीटकनाशक
तुळशिराम करंगामीचा काटा काढायचा बेत त्याची पत्नी लता, सासू शांताबाई व लताचा प्रियकर ईशांत याने रचला होता. कार्यक्रमाच्या दिवशी काहीवेळा अगोदर या तिघांनी इंजेक्शनच्या सहाय्याने दारूच्या बॉटलमध्ये कीटकनाशक सोडले व सदर दारू तुळशिरामला पिण्यास दिली. या कीटकनाशकयुक्त दारूमुळे तिघांचा बळी गेला. तुळशिराम हा मूळचा धानोरा तालुक्यातील चुडियाल येथील रहिवासी होता. त्यामुळे त्याचा अंत्यविधी चुडियाल येथेच आटोपण्यात आला. चुडियाल येथे अंत्यविधीसाठी आल्यानंतर लताने चुडियाल येथे शेतशिवारात इंजेक्शन फेकून दिले. तपासात लताने ही बाब मान्य केल्याने पोलिसांनी तिला चुडियाल येथे आणून गावातील पंचासमक्ष सदर इंजेक्शन ताब्यात घेतले.