बहुतांश शाळांत नेट कनेक्टीव्हिटी नाही
By Admin | Updated: September 16, 2014 23:42 IST2014-09-16T23:42:54+5:302014-09-16T23:42:54+5:30
राज्य शासनाने जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया मे महिन्यापासून

बहुतांश शाळांत नेट कनेक्टीव्हिटी नाही
कव्हरेज गूल : लिपिक, शिक्षकांची जिल्हा मुख्यालयी धाव
गडचिरोली : राज्य शासनाने जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाईन प्रक्रिया मे महिन्यापासून सुरू केली. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आश्रमशाळा, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सादर करण्यासाठी लिपिक व शिक्षकांना जिल्हा तसेच तालुका मुख्यालयी धाव घ्यावी लागत आहे.
राज्य शासनाने ‘ई-प्रशासन, सुप्रशासन’ ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. या संकल्पनेच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कार्यालयातील अनेक दस्तावेज आॅनलाईन करण्यात आले आहे. मात्र गडचिरोलीसारख्या दुर्गम नक्षल प्रभावित जिल्ह्यात पूर्णपणे नेट कनेक्टिव्हिटीची सुविधा निर्माण करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.
सध्य:स्थितीत शेकडो ग्रामपंचायतीमध्येही नेट कनेक्टिव्हिटी नसल्याची माहिती आहे. संबंधीत गावातील ग्रामसेवकाला आॅनलाईन कामासाठी वारंवार जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने मे महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेत्तर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन आॅनलाईन प्रक्रियेद्वारे करण्यास सुरूवात केली आहे. या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत प्रत्येक गावात तसेच शाळांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी करण्यात आली नाही. यामुळे आॅनलाईन कामे करताना ग्रामीण व दुर्गम भागात बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पात २४ शासकीय तसेच १९ खासगी अनुदानित अशा एकूण ४२ आश्रमशाळा आहेत. मात्र यापैकी एकाही आश्रमशाळेमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे.
याशिवाय गॅरापत्ती, कोटगुल, सावरगाव, गोडलवाही, पेंढरी या आश्रमशाळांमध्ये बीएसएनएल सेवेचे कव्हरेज राहत नाही. आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके आॅनलाईन सादर करता यावे, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्यावतीने काही दिवसांपूर्वी प्रकल्पातील सर्वच आश्रमशाळा व वसतिगृहांना थ्रीजी सेवेचे नेटसेटर पुरविण्यात आले आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील गावांमध्ये बीएसएनएलचे कव्हरेज राहत नसल्याने पुरविण्यात आलेले थ्रीजी सेवेचे नेटसेटरही सध्या निकामी ठरले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)