५५६ गावांमध्ये होणार डासनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:47+5:30

डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती असणारी स्थाने नष्ट करणे, नाल्या वाहत्या करणे, टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी उपक्रमांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार होती. परंतू या कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रमही अद्याप अनेक ठिकाणी राबविलेला नाही.

Mosquito repellent spraying will be done in 556 villages | ५५६ गावांमध्ये होणार डासनाशक फवारणी

५५६ गावांमध्ये होणार डासनाशक फवारणी

Next
ठळक मुद्दे२६ जूनपासून सुरूवात : जिल्ह्यातील चार लाखांवर नागरिकांना मिळणार कीटकनाशकभारीत मच्छरदाण्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात सर्वाधिक प्रमाणात कीटकजन्य आजाराचे प्रमाण असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी ५५६ गावांमध्ये डासनाशकाची फवारणी केली जाणार आहे. दरवर्षी जवळपास १५०० गावांमध्ये ही फवारणी होत असते. यावर्षी मात्र निधीच्या कमतरतेमुळे डासजन्य आजारांचे प्रमाण जास्त असणाºया ५५६ गावांचीच फवारणीसाठी निवड करण्यात आली आहे. असे असले तरी यावर्षी अनेक गावांना मच्छरदाण्यांचे वाटप होणार आहे.
आरोग्य सेवा संचालनाच्या वतीने दरवर्षी जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळला जातो. त्यानुसार यावर्षीही ३ जूनपासून ते ३० जूनपर्यंत ‘एक दिवस एक कार्यक्रम’ याप्रमाणे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. कीटकजन्य आजाराबाबत सर्व्हेक्षण, फवारणी, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, मच्छरदान्यांचा वापर, डासांपासून स्वत:चे रक्षण कसे करावे याबाबतची माहिती पुरवणे, कीटकजन्य आजाराविषयी प्रचार साहित्य जनतेपर्यंत पोहोचविणे अशा विविध कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
या कामांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गाव, प्रभाग पातळीवर ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, महिला मंडळे यांचा सहभाग घेऊन जनजागृती केली जाणार आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी (पुरूष व स्त्री) तसेच आरोग्य सहायक यांच्या माध्यमातून जलद ताप रुग्णांचे सर्व्हेक्षणही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतू या सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत.
दि.२६ पासून पुढील २० दिवस ५५६ गावांमध्ये २२२ हंगामी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डासनाशकाची फवारणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ६ लोकांची एक टीम अशा ३७ टीम बनविण्यात आल्या आहेत. जून-जुलैमधील पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात केली जाणार आहे.

स्वच्छता मोहिमेची गती वाढविण्याची गरज
डास नियंत्रणासाठी डासांची उत्पत्ती असणारी स्थाने नष्ट करणे, नाल्या वाहत्या करणे, टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावणे आदी उपक्रमांमध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जाणार होती. परंतू या कामांनी अद्याप वेग घेतलेला नाही. आरोग्य कर्मचारी आणि क्षेत्र कर्मचाऱ्यांमार्फत डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रमही अद्याप अनेक ठिकाणी राबविलेला नाही. त्याला गती देण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील अनेक भागात आणि ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहेत.

हिवताप प्रतिरोध महिन्याचे नियोजन बिघडले
यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिवताप प्रतिरोध महिन्यातील विविध कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांना अद्याप सुरूवात झालेली नाही. यावर्षी निधीही पुरेसा नसल्यामुळे अनेक ठिकाणी काटकसर केली जात आहे.

यावर्षी देणार सर्वाधिक मच्छरदाण्या
आरोग्य विभागाकडून यावर्षी गडचिरोली जिल्ह्याला ४ लाख ६९५ मच्छरदाण्या मिळणार आहेत. त्या १३७७ गावांमध्ये वाटप करण्यात येणार आहेत. मात्र एवढ्या मच्छरदाण्या कुठे ठेवायच्या, अशा प्रश्न निर्माण झाला असून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी त्यांचा साठा करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तीन वेगवेगळ्या आकाराच्या या मच्छरदाण्यांमध्ये मोठ्या आकाराच्या मच्छरदाण्या सर्वाधिक राहणार आहेत. अद्याप त्या मच्छरदाण्या मिळालेल्या नाही, मात्र लवकरच त्या मिळतील आणि पुढील महिन्यात त्याचे वाटपही सुरू होईल, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी सांगितले.

Web Title: Mosquito repellent spraying will be done in 556 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य