पहाटेचा गजर शतकोत्तर
By Admin | Updated: November 20, 2015 01:50 IST2015-11-20T01:50:48+5:302015-11-20T01:50:48+5:30
पहाटेच्या शांत व सोज्वळ वातावरणात टाळ, मृदंग, ढोलकीचा गजर, भक्तिभाव भाविकांना परमेश्वर चरणी लीन करीत असतो.

पहाटेचा गजर शतकोत्तर
१९१५ पासून सुरुवात : आरमोरीतील भगवान राम व विठ्ठल मंदिरात काकड आरती
आरमोरी : पहाटेच्या शांत व सोज्वळ वातावरणात टाळ, मृदंग, ढोलकीचा गजर, भक्तिभाव भाविकांना परमेश्वर चरणी लीन करीत असतो. अगदी अश्विन पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या काकड आरतीत महिनाभर भाविक दंग होतात. काकड आरतीच्या भक्तिमय स्वरूपाला ऐतिहासिक परंपरा लाभत असेल तर त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त होते अशीच ऐतिहासिक परंपरा लाभली आहे, ती आरमोरी येथील काकड आरतीला. येथील राम मंदिर व विठ्ठल मंदिरात १९१५ मध्ये सुरू करण्यात आलेली काकड आरती १०१ वर्षाची झाली आहे. सध्या तिची शतकोत्तर वाटचाल होत आहे. १०१ वर्षांपासून अविरत एक महिना पहाटेचा गजर सर्वत्र निनादत आहे.
आरमोरी शहरात तलावालगत अनेक ऐतिहासिक व पुरातन काळातील मंदिरे आहेत. त्यामुळेच आरमोरी शहराला भक्तिभावाचाही ऐतिहासिक वारसा आहे. येथील भिवाजी वाकडे यांनी १९१५ मध्ये सर्वप्रथम विठ्ठल मंदिरात काकड आरतीची सुरुवात केली होती. त्यानंतर सुखाजी चौके, दौलत हजारे, वासुदेव जुआरे यांनी काकड आरतीची परंपरा पुढे कायम ठेवली.
कोजागिरी पौर्णिमेनंतर अश्विन पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होत असते. टाळ, मृदंग, ढोलकी व भजनाचे स्वर पहाटे सर्वत्र गुंजतात. महिनाभर भाविकांसाठी पर्वणी तर असतेच परंतु कधीही मंदिरात न जाणारेही भक्तिमय होऊन जातात. सध्या आरमोरी येथे पहाटे ५ वाजता भाविक स्नान करून काकड आरतीत सहभागी होत आहे. त्यामुळे महिनाभरापासून येथे भक्तीच्या सूरांचा गजर आहे. आत्मशांती व सामाजिक सलोख्यासाठी आरती केली जात असून कार्तिक पौर्णिमेला काकड आरतीचा समारोप होणार आहे. शेवटच्या दिवशी पहाटे नदीमध्ये घटाचे विसर्जन केले जाणार आहे. त्यानंतर दिवसभर भजन व गोपालकाला, सायंकाळी महाप्रसाद वितरण व विठ्ठल मंदिरातून रात्री गरूडाच्या मूर्तीची शहरातून मिरवणूक काढली जाणार आहे.
१०१ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या काकड आरतीची परंपरा पुढे नेण्यासाठी सध्या राम मंदिराचे अध्यक्ष सुभाष खोब्रागडे, विलास जुआरे, दशरथ दहिकार, मुखरू चौके, मधुकर दहिकार, धाबे महाराज, शामराव दहिकार, अरुण बांते, महेंद्र दहिकार, दिनेश दहिकार, संदीप दहिकार, सतीश दहिकार, कमलाबाई हेमके, प्रिन्स भानारकर, गोपाल दहिकार, भाऊराव कापकर, युवराज पिंपळकर, प्रकाश हजारे, गजानन कुकडकर, गोपाल चौके, अरविंद मंगरे, भाऊराव कापकर, अनिल मंगरे, चंद्रशेखर दहिकार, अनिकेत जुआरे सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)