देसाईगंजमधील स्मृतिस्तंभाने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:51+5:302021-07-21T04:24:51+5:30
शहरातून जाणाऱ्या देसाईगंज-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या काळात देशासाठी शहीद झालेल्या बाबुराव थोरात व ज्यांनी शहराच्या निर्मितीत योगदान दिले ...

देसाईगंजमधील स्मृतिस्तंभाने घेतला मोकळा श्वास
शहरातून जाणाऱ्या देसाईगंज-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या काळात देशासाठी शहीद झालेल्या बाबुराव थोरात व ज्यांनी शहराच्या निर्मितीत योगदान दिले त्या सी.सी. देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्तंभ उभारण्यात आला आहे. शहराला लाभलेला हा अनमोल ठेवा जपण्याची गरज असताना अतिक्रमणधारकांनी स्मृतिस्तंभांना विळखा घातला. त्यामुळे दोन्ही स्मृतिस्तंभ नागरिकांच्या दृष्टिपथास पडत नव्हते. दरम्यान, मंगळवार दि. २० जुलै रोजी देसाईगंज नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून स्मृतिस्तंभासभोवतालचे अतिक्रमण हटवण्यात आले.
(बॉक्स)
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
हे अतिक्रमण हटवून थोरात आणि देसाई यांच्या स्मृतिस्तंभांना मोकळे करावे. त्यांचे माहात्म्य जपण्यासोबत त्याबाबतची ओळख नवीन पिढीला व्हावी यासाठी ‘लोकमत’ने बातम्या प्रकाशित करून नगर परिषदेचे लक्ष वेधले होते. अखेर त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
(बॉक्स)
फवारा चौकातील अतिक्रमण कधी हटणार?
शहरातील प्रमुख चौकांपैकी फव्वारा चौक हा मुख्य चौक आहे. पूर्वी राजकीय सभा, सामाजिक कार्यक्रम तसेच धार्मिक उत्सव साजरा करण्याच्या हेतूने या चौकात एक व्यासपीठही बांधण्यात आले आहे. त्या ठिकाणी दुर्गा उत्सवादरम्यान देवीची प्रतिष्ठापना करून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. मात्र ते व्यासपीठच अतिक्रमण करून गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शहराच्या या मुख्य चौकातील व्यासपीठ अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करून चौकाला गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी जोर धरत आहे.