पैशाअभावी एटीएम ‘शटर डाऊन’
By Admin | Updated: March 28, 2016 01:34 IST2016-03-28T01:34:51+5:302016-03-28T01:34:51+5:30
सलग चार दिवसांच्या सुट्यांमुळे एसबीआय बँकेचे एटीएम वगळता इतर सर्वच बँकांचे एटीएम शुक्रवारपासूनच

पैशाअभावी एटीएम ‘शटर डाऊन’
गडचिरोली : सलग चार दिवसांच्या सुट्यांमुळे एसबीआय बँकेचे एटीएम वगळता इतर सर्वच बँकांचे एटीएम शुक्रवारपासूनच खळखळाट झाले. त्यामुळे बहुतांश बँकांनी एटीएम शनिवारपासून शटर डाऊन करून ठेवले.
रंगपंचमी, गुडफ्रायडे, चौथा शनिवार व रविवार अशा लागोपाठ चार दिवसांच्या सुट्या आल्या. रंगपंचमीचा सण असल्याने बहुतांश नागरिकांनी गुरूवारीच एटीएममधून पैसे काढले. त्यामुळे गुरूवारीच बहुतांश एटीएम रिकामे झाले होते. त्यानंतर सोमवारशिवाय पैसे टाकणे शक्य नाही. ही बाब बँक प्रशासनाच्या लक्षात आल्याने बँकांचे एटीएम शटर डाऊन करून ठेवले. काही बँकांच्या एटीएमचे दार सुरू असले तरी त्यामध्ये पैसे नसल्याने एटीएमपर्यंत गेलेले नागरिक तपासणी करून परत येत होते. बँकांना दुसऱ्या व चवथ्या शनिवारी सुटी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच चार दिवसांच्या सुट्या मिळाल्या आहेत.
पुढील आठवड्यात मार्च एन्डींग सुरू होणार आहे. त्यामुळे याही आठवड्यात जवळपास दोन दिवस बँका बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकांना लागोपाठ सुट्या आल्यानंतर पुरेशी रक्कम एटीएममध्ये जमा करून ठेवल्यास नागरिकांना सोयीचे होईल. सतत चार दिवस जिल्हाभरातील बँका बंद असल्याने व्यापारी व सामान्य नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. रविवारी बाजार असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचीही पंचाईत झाली. (नगर प्रतिनिधी)
एसबीआयच्या एटीएमवर भिस्त
४एसबीआय बँकेचे एटीएम शनिवारी शटर डाऊनच होते. मात्र रविवारी एटीएम सुरू करण्यात आले. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याने ग्राहकांचा ओढा एसबीआय बँकेच्या एटीएमकडे वाढला होता. सकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची रांग लागली होती. मात्र या एटीएममधीलही १०० च्या नोटा सायंकाळपर्यंत संपल्या होत्या. त्यामुळे किमान ५०० रूपये काढल्याशिवाय नागरिकांकडे पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. सुट्यांच्या कालावधीत पुरेशी रक्कम टाकून ठेवण्याची मागणी आहे.