विनयभंगप्रकरणी आरोपीला शिक्षा
By Admin | Updated: December 1, 2015 05:41 IST2015-12-01T05:41:43+5:302015-12-01T05:41:43+5:30
देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा सत्र

विनयभंगप्रकरणी आरोपीला शिक्षा
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षांचा कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे.
सावंगी येथील एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत १४ जानेवारी २०१४ रोजी शेतावर गेली होती. आजी शेतामध्ये काम करीत होती तर पीडित मुलगी शेतातील बोरीच्या झाडाखाली बोर वेचत होती. दरम्यान, नूर मोहम्मद ताहीर गाजी हा तिच्या जवळ येऊन त्याने सदर मुलीचा उजवा हात पकडून विनयभंग केला. त्यामुळे मुलीने ओरडण्यास सुरूवात केली. आजी जवळ असल्याचे लक्षात आल्यानंतर घटनास्थळावरून नूर मोहम्मद ताहीर गाजी पसार झाला. त्यानंतर घडलेली सर्व हकीकत वडिलांना सांगितली. वडिलांनी याबाबतची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नूर मोहम्मद ताहीर गाजी याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा निकाल सोमवारी लागला असून विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधिश यु. एम. पदवाड यांनी आरोपीला दोषी ठरवून कलम ३५४ (अ) (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये तीन वर्ष कारावास व तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास कुरखेडाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी केला. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सरीता किशोर ताराम यांनी काम पाहिले.