मोहफुलाला आले ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: April 23, 2015 01:32 IST2015-04-23T01:32:30+5:302015-04-23T01:32:30+5:30
१ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्याने गडचिरोलीच्या सीमेलगत असलेल्या भागातून येणारी देशी, विदेशी दारू बंद झाली आहे.

मोहफुलाला आले ‘अच्छे दिन’
प्रविण खेडेकर भाडभिडी
१ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी झाल्याने गडचिरोलीच्या सीमेलगत असलेल्या भागातून येणारी देशी, विदेशी दारू बंद झाली आहे. त्यामुळे आता मोहफुलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून यंदा जुन्या मोहफुलांना ५५ रूपये किलो तर नव्या मोहफुलांना २५ रूपये किलो भाव दिला जात आहे. दारू विक्रेत्यांकडून मोहफुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने यंदा मोहाला अच्छे दिन आल्याची भावना मोहफूल संकलन करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के जंगल असल्यामुळे जंगलाच्या भरवशावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. जंगलातून मोह व अन्य वनोपज संकलन करण्याचे काम नागरिक करतात. या मोहफुलाच्या भरवशावर अनेकजण दारूही काढतात. आतापर्यंत मोहफुलाला फारसा भाव मिळत नव्हता. १९९३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी झाल्यानंतरही या जिल्ह्यात मोहाची दारू काढण्याचे काम अनेकजण करीत होते. यंदा चंद्रपूरचीही दारूबंदी झाली आहे. दारूबंदीच्या तोंडावरच मोहफुलाचा हंगामही आल्याने आता मोहफुलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकाएकीच ही मागणी वाढल्यामुळे दारूविक्रेत्यांचे अर्थकारण यामागे असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कधी नव्हे ते चढत्या भावाने मोहाची खरेदी केली जात आहे. जुने असलेले मोह ५५ रूपये भावाने तर नवीन मोह २५ किलो दराने घेतले जात आहे.
मोहाच्या दारूचीही किमत वाढली असून पूर्वी ८० रूपयाला मिळणारी बाटली आता १०० रूपयावर पोहोचली आहे. त्यामुळे मोहफूल संकलन करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. या परिसरात जंगलात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, महिला मोहफूल संकलन करण्याचे काम करताना दिसून येतात. गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने अनेकांचे मोहफूल वाळविण्यासाठी ठेवले होते ते खराब झाले आहे. अशाही मोहाला मोठी मागणी असल्याचे नागरिक सांगत आहे.