बालकांना मोबाईलचे वेड; पारंपरिक खेळ कालबाह्य

By Admin | Updated: November 14, 2015 01:34 IST2015-11-14T01:34:07+5:302015-11-14T01:34:07+5:30

१० ते १५ वर्षांच्या पूर्वीचा विचार केल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने ...

Mobile wax; The traditional game is out of date | बालकांना मोबाईलचे वेड; पारंपरिक खेळ कालबाह्य

बालकांना मोबाईलचे वेड; पारंपरिक खेळ कालबाह्य

बालक दिन विशेष : आधुनिकतेच्या नावावर हरवत चालले बालपण; खेड्यातूनही लुप्त होत आहेत खेळणी
गडचिरोली : १० ते १५ वर्षांच्या पूर्वीचा विचार केल्यास मैदानात मुलांचे सुरू असलेले खेळ, प्रत्येकाच्या घरावर डौलाने मिरविणारा एन्टिना, ५-१०-२५ पैशांची नाणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे चित्र दिसत होते. पण सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हे सर्व खेळ व वस्तू लुप्त झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली बालकांचे बालपण हरवत चालले आहे. पारंपरिक खेळांतील वस्तूंच्या आठवणी ताज्या करण्याकरिता सध्या केवळ चित्र आणि फोटोच उरले आहेत. सध्या व्हॉट्सअ‍ॅप या अप्लिकेशनच्या माध्यमातून हे जुने फोटो एकमेकांना पाठवून तो काळ पाहिलेले युवक व वृद्ध जुन्या आठवणींना उजाळा देत असल्याचेच दिसून येत आहे.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मैदानातील खेळांना अनन्यसाधारण महत्त्व होते. यात सर्वच खेळांचा समावेश होत असला तरी सध्या केवळ क्रि केट हाच खेळ चिमुकले खेळताना दिसतात. पूर्वी गिल्ली-दांडू हा खेळ मुलांमध्ये प्रसिद्ध होता.
हल्ली हा खेळ कुठेही खेळला जात नसून त्यासाठी मैदानेही नाही, अपवादात्मक खेड्यांमध्ये दिसून येईल. हे वास्तव आहे. लगोरी, लंगडी या खेळांचा प्रकार असलेला सातघर हे खेळ मुलींमध्ये त्या काळी प्रसिद्ध होते. सध्या मुलं-मुली प्रगत झाल्यागत वागत असल्याने हे जुनाट खेळ खेळले जात नाही. पूर्वी गल्ली-बोळात खेळले जाणारी लगोरी, लंगडी हे खेळ आता दिसेनासे झाले आहेत. आता मुला-मुलींमध्ये संगणक, मोबाईलवरील खेळांसह टीव्हीवरील व्हिडीओ गेम अधिक प्रसिद्ध झाले आहेत. बसल्या जागेवर खेळले जाणारे हे खेळ मुले खेळतात.
यात शरिराला कुठलाही व्यायाम होत नाही. उलट विकार वाढण्यास आणि शारीरिक विकास खुंटण्यास हे खेळ कारणीभूत ठरत आहेत. मानसिकरित्या नवीन पिढी प्रगत घडत असली तरी दिवसेंदिवस शारीरिकदृष्ट्या दोष असलेली मुले-मुली अधिक आढळून येत आहेत. मुलांमध्ये गिल्ली-दंड्यासह भोवरा हा खेळही मोठाच प्रसिद्ध होता. एकट्यानेही तो खेळता येत होता आणि चार-चौघे जमले तर त्यात धम्माल असायची. पण सध्या प्लास्टिकचे भोवरे बाजारात मिळतात. या भोवऱ्यांना दोराने फिरवावेही लागत नाही. त्यासाठी तत्सम यंत्रही मिळते. यातही शरिराला व्यायामासाठी कुठेच वाव नाही. शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, फुटबॉल यासह अन्य खेळ खेळविले जात असून स्पर्धाही घेतल्या जातात. तेवढाच विद्यार्थ्यांना व्यायाम होतो; पण या मातीतील खेळातून होणारी कसरत बंद झाल्याचे चित्र आहे. हल्ली मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवरच मुला-मुलींच्या विविध खेळांतील गमती-जमती होत असल्याने बालकांना पूर्वीसारखे पारंपरिक खेळ खेळण्यास मिळत नाही. त्यामुळे बालपण हरवत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mobile wax; The traditional game is out of date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.