लाखो क्विंटल धान उघड्यावर
By Admin | Updated: March 22, 2015 00:28 IST2015-03-22T00:28:48+5:302015-03-22T00:28:48+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ...

लाखो क्विंटल धान उघड्यावर
दिगांबर जवादे गडचिरोली
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन लाख आठ हजार क्विंटल धानापैकी सुमारे १ लाख ८६ हजार क्विंटल धान ताडपत्री झाकून खरेदी केंद्रावरच ठेवण्यात आले आहेत. सदर धानाची उचल करून ते गोदामामध्ये ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासोबतच बीपीएल लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या मार्फतीने आदिवासी विकास महामंडळ उपयोजना क्षेत्रात धानाची खरेदी करते. गडचिरोली प्रादेशिक विभागांतर्गत यावर्षी ५६ धान खरेदी केंद्रावर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या मार्फतीने धानाची खरेदी करण्यात आली. सुरूवातीपासून १७ मार्चपर्यंत ५६ केंद्रावर सुमारे तीन लाख आठ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यापैकी केवळ ५१ हजार १३० क्विंटल धान गोदामात व्यवस्थित ठेवण्यात आले आहे. तर ७१ हजार १०४ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे.
शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक निघताच धानाची विक्री केली. त्यामुळे मागील दोन महिन्यात धानाची प्रचंड प्रमाणात आवक वाढली होती. त्या तुलनेत भरडाईची गती कमी असल्याने धानाची उचल करण्यात अडचण जात आहे. धान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये आदिवासी विकास महामंडळ शासनाची एजन्सी म्हणून काम करते. त्यामुळे धानाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला आहेत. मागील तीन महिन्यांपासून खरेदी केलेला धान उचल होत नसल्याने आदिवासी विकास महामंडळाने सदर धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवला आहे. धानाचे अवकाळी पाऊस व मोकाट जनावरांमुळे नुकसानही होत आहे. सदर नुकसान खरेदी केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांना उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)
अनुभवातून धडा नाहीच
धानाची उचल न झाल्याने दोन वर्षांपूर्वी अशा प्रकारे उघड्यावर ठेवलेले लाखो क्विंटल धान खराब झाले. या धानाची दुर्गंधी यायला लागली. परिणामी १४०० रूपये क्विंटलने घेतलेले धान १०० रूपये क्विंटल दराने विकण्याची पाळी शासनावर आली होती. त्यावर्षी शासनाला कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागला होता. यापासून शासन काही धडा शिकेल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या धोरणात काहीही बदल झाला नाही. त्याचाच परिणाम म्हणजे तीन महिन्यांपासून धान उघड्यावरच ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे.
गोदामांची कमतरता
खरेदी केलेले धान भरडाई करून अन्न महामंडळाला विकल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात अन्न महामंडळाकडे अत्यंत मर्यादित प्रमाणात गोदाम उपलब्ध आहेत. त्यामुळे भरडाई केलेले तांदूळ ठेवण्याची अडचण आहे. परिणामी महिन्याचे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच धान भरडाई करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. त्यामुळेच धानाची उचल करण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतरही गोदाम नसल्याने धानही ठेवण्याची अडचण निर्माण झाली आहे.