ट्रकसह लाखोंचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:12 IST2018-04-12T22:12:09+5:302018-04-12T22:12:09+5:30
सिरोंचा तालुक्याच्या जंगलातील मौल्यवान सागवान तेलंगणा राज्यात नेण्याचा तस्करांचा प्रयत्न तेलंगणा वनविभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. तेलंगणातील पलमेला वनपरिक्षेत्रातील मुकनूर येथे सागवानी लाकडांनी भरलेला ट्रक पकडण्यात आला.

ट्रकसह लाखोंचे सागवान जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्याच्या जंगलातील मौल्यवान सागवान तेलंगणा राज्यात नेण्याचा तस्करांचा प्रयत्न तेलंगणा वनविभागाच्या सतर्कतेने हाणून पाडण्यात आला. तेलंगणातील पलमेला वनपरिक्षेत्रातील मुकनूर येथे सागवानी लाकडांनी भरलेला ट्रक पकडण्यात आला. ही कारवआई बुधवारी रात्री करण्यात आली. मात्र ट्रकचालकासह इतर आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.
सिरोंचा तालुक्यातील जंगलात असलेले सागवान उच्च प्रतीचे आहे. त्यामुळे या जंगलावर शेजारच्या तेलंगणाातील वनतस्करांची वाकडी नजर आहे. वनतस्कर थांबविण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वन विभागाच्या समन्वयातून संयुक्त कारवाई करण्याचे नियोजन काही महिन्यांपूर्वी केले होते. यानंतर काही कारवाया झाल्याही. मात्र त्यानंतर पुन्हा वनतस्करी रोखण्यात वनविभाग अपयशी ठरला. बुधवारी रात्री जंगलातून कापलेले मोठे सागवानी लाकडे ट्रकमध्ये भरून तेलंगणात नेले जात होते. याबाबतची माहिती तेलंगणातील पनमेला वनपरिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या पथकाला मिळताच त्यांनी तो ट्रक अडवून कारवाई केली.
जानेवारी महिन्यात अशाच प्रकारे वनतस्करांवर झालेल्या कारवाईत ४ आरोपींना अटक झाली होती. २३ मार्चला तेलंगणाच्या बोरकुगुड्डम येथे कारवाई झाली. त्यात जवळपास १० लाखांची लाकडे जप्त झाली होती. हे सर्व सागवान लाकडून सिरोंचातील जंगलातून कापले जात आहे. मात्र त्याकडे वनविभागाचे पूर्ण लक्ष नाही.