एमआयडीसी रखडली
By Admin | Updated: October 22, 2014 23:17 IST2014-10-22T23:17:16+5:302014-10-22T23:17:16+5:30
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तीन तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या औद्योगिक वसाहतीत एकही उद्योग सुरू झालेला नाही.

एमआयडीसी रखडली
बेरोजगारीत वाढ : तीन तालुका मुख्यालयांत केवळ फलक लागले
गडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तीन तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या औद्योगिक वसाहतीत एकही उद्योग सुरू झालेला नाही. केवळ फलक तेवढा लागलेला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे ९.२० हेक्टर, कुरखेडा येथे १६.४८ हेक्टर व धानोरा येथे ११.८० हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीने जागांचे अधिग्रहण करून कुरखेडा येथे औद्योगिक वसाहतीचा फलकही लावण्या आला होता. मात्र या तीनही ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत एकही उद्योग सुरू झालेला नाही. २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला. परंतु गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकास शासनाला करता आला नाही. केवळ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी औद्योगिक वसाहत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्थापन केली. परंतु येथेही मोठ्या रोजगार निर्मितीचे प्रकल्प आले नाहीत. अनेक भुखंड राजकीय लोकांनी आपल्याकडे ठेऊन घेतले. तेथे उद्योग उभा झाला नाही.
त्याच प्रमाणे कुरखेडा, अहेरी व धानोरा या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु येथेही एकही उद्योग सुरू झाला नाही. अनेक लहान उद्योजकांनी येथे भुखंड मिळावा म्हणून प्रयत्न केलेत. परंतु अजुनही त्यांनाही भुखंड देण्यात आले नाही. आर. आर. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात गौण वनउपजावर प्रक्रिया करणारे उद्योग चामोर्शी, आष्टी भागात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आष्टी एमआयडीसीसाठी अजुनही जागा प्रशासनाला मिळविता आली नाही. त्यामुळे हा प्रश्नही रेंगाळत पडला आहे. आता नव्या सरकारला जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना तसेच कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)