ग्रंथदिंडीतून दिला वाचन संस्कृतीचा संदेश
By Admin | Updated: January 21, 2016 00:22 IST2016-01-21T00:22:37+5:302016-01-21T00:22:37+5:30
शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने बुधवारी ..

ग्रंथदिंडीतून दिला वाचन संस्कृतीचा संदेश
शहर दुमदुमले : खासदारांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ; २५ शाळांचा सहभाग
गडचिरोली : शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने बुधवारी सकाळी ९ वाजता ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी येथील इंदिरा गांधी चौकातून सर्वोदय वॉर्ड मार्गाने गुजरी परिसरातून मुख्य मार्गाने ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत गडचिरोली शहर व परिसरातील जवळपास २५ शाळांचा सहभाग होता.
या ग्रंथदिंडीचा शुभारंभ इंदिरा गांधी चौकात खा. अशोक नेते व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या हस्ते ग्रंथपूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी विभा डांगे, उपशिक्षणाधिकारी निकम, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, प्राचार्य लीना हकीम, माध्यमिक शिक्षण विभागाचे साई कोंडावार आदींसह कनिष्ठ प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्रंथदिंडीत शहरातील शाळांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध प्रकारची वेशभूषा धारण करून समाजजीवनाचे दर्शन घडविले. अनेक विद्यार्थ्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, झांशीची राणी, संत व महापुरूषांची वेशभूषा साकारली.
या ग्रंथदिंडीत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, वसंत विद्यालय, संत गाडगे महाराज विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल सोनापूर, गोंडवाना सैनिकी विद्यालय, विद्याभारती कन्या हायस्कूल, राणी दुर्गावती कन्या विद्यालय गडचिरोली, आदीसह २५ शाळांतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीचा समारोेप सकाळी ११ वाजता धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या कविवर्य मंगेश पाडगावकर नगरीत करण्यात आला. या दिंडीदरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरक्षित केली.