लग्नपत्रिकेतून पर्यावरण संरक्षण व बेटी बचाओचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:56 PM2018-02-24T23:56:30+5:302018-02-24T23:56:30+5:30

लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे.

Message from Environmental Protection and Beti Bachao from the wedding book | लग्नपत्रिकेतून पर्यावरण संरक्षण व बेटी बचाओचा संदेश

लग्नपत्रिकेतून पर्यावरण संरक्षण व बेटी बचाओचा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देलग्नाचा बडेजाव करण्याच्या पद्धतीला फाटा : लग्न संस्काराबरोबरच सामाजिक बांधिलकीचा परिचय

दिगांबर जवादे।
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : लग्न कार्याच्या माध्यमातून प्रतिष्ठा, श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अत्यंत महागड्या लग्नपत्रिका छापल्या जात असल्याचे आपण बघितले आहे. मात्र चामोर्शी येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या पंकज नरूले यांनी स्वत:च्या लग्नपत्रिकेवर पर्यावरण संवर्धन, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारा संदेश छापला आहे. लग्न कार्याचे निमंत्रण देण्याबरोबरच सामाजिक कार्याचे आशय असलेली ही लग्नपत्रिका निमंत्रितांचे लक्ष वेधून घेत आहे.
लग्न हे एक संस्कार असले तरी काळाच्या ओघात लग्नावरील खर्च वाढत चालला आहे. श्रीमंत व्यक्ती खर्च करीत असल्याने त्याचे अनुकरण करून गरीब व्यक्तीही कर्जाच्या खाईत डुबतो. त्याच्या परीने जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करतो. लग्न कार्याचे निमंत्रण लग्नपत्रिकेच्या माध्यमातून दिले जाते. लग्नपत्रिका बघितल्यानंतरच आपली प्रतिष्ठा, श्रीमंती यांची जाणीव व्हावी, यासाठी लाखो रूपये शेकडा किंमत असलेल्या पत्रिका छापल्या जातात. मात्र प्रा. पंकज नरुले यांच्या लग्नाची पत्रिका अत्यंत कमी खर्चाची असली तरी सदर पत्रिका सुध्दा निमंत्रीतांचे लक्ष वेधून घेत आहे.
पेशाने प्राध्यापक असले तरी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असलेल्या प्रा. पंकज नरूले यांच्या लग्नाची पत्रिका निमंत्रितांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. प्रा. पंकज नरुले यांची लग्नपत्रीका अत्यंत साधी आहे. लग्न पत्रिकेच्या कव्हरवर स्वच्छतेचा संदेश देणाºया महात्मा गांधीजींच्या चष्म्यामध्ये वर पंकज व वधू मेघा यांचे नाव लिहिण्यात आले आहे. लग्नाची तारीख, दिनांक व वेळ एका हिरव्या रंगाच्या झाडावर टाकण्यात आली आहे. या सर्व बाबी ‘वृक्षावल्ली आम्हां सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाभोवती गुंफण्यात आल्या आहेत. लग्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि निरोगी राहा हा संदेश देण्यात आला आहे.
विवाहाचा जो संस्कार ।
त्याचे महत्त्व सर्वांत थोर ।।
त्या पायावरीच समाज मंदिर ।
म्हणोनी सुंदर करू यासि ।।
हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार लग्नपत्रिकेवर मांडण्यात आले आहेत. लग्नपत्रिकेच्या शेवटच्या पृष्ठावर बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबतचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर ‘विद्यविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार छापण्यात आले आहेत. चार पानाच्या या लग्नपत्रिकेवर केवळ आतील दोन पानावर लग्न समारंभाप्रसंगी माहिती देण्यात आली आहे. बाहेरची दोन्ही पाने व लिपाफ्यावर सामाजिक आशय छापण्यात आला आहे.
सामाजिक आशय असलेली जिल्ह्यातील ही पहिलीच लग्नपत्रिका आहे. पेशाने प्राध्यापक असलेल्या पंकज नरूले हे सुध्दा लग्नपत्रिकेवर लाखो रूपये खर्च करू शकले असते. मात्र या सर्व बाबींना फाटा देत त्यांनी सामाजिक आशय असलेली साधी पत्रिका प्रकाशित केली. एवढेच नव्हे तर लग्नकार्य त्यांनी गडचिरोलीसारख्या शहरात न ठेवता अगदी बोडधा येथील वधूच्या गावीच ठेवले आहे. यावरून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव होण्यास मदत होते. त्यांचा हे लग्न इतरांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणारे आहे.

Web Title: Message from Environmental Protection and Beti Bachao from the wedding book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.