सदस्य गैरहजर; अविश्वास बारगळला
By Admin | Updated: September 20, 2015 01:55 IST2015-09-20T01:55:51+5:302015-09-20T01:55:51+5:30
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत ...

सदस्य गैरहजर; अविश्वास बारगळला
जि.प.तील राजकारण : अध्यक्ष, उपाध्यक्ष, समाज कल्याण सभापतींना जीवदान
गडचिरोली : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने बारगळला. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांना जीवदान मिळाले.
आॅगस्ट महिन्यात विरोधकांकडून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांचे मनसुबे हाणून पाडत जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांनी अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी लागणाऱ्या १८ सदस्यांची जुळवाजुळव करुन ५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना व युवाशक्ती संघटनेच्या काही सदस्यांच्या सहया होत्या. हे सदस्य व आणखी काही सदस्य सहलीला रवाना झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मदतीला नायब तहसीलदार एम.एम. शेंडे व उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक हेही सभागृहात उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेची वेळ होती. परंतु ५० पैकी एकही सदस्य सभागृहात उपस्थित झाला नाही. अविश्वास प्रस्ताव पारित होण्यासाठी ३४ सदस्यांची, तर फेटाळून लावण्यासाठी १७ सदस्यांची गरज होती. परंतु एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. अविश्वास बारगळल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांशी तसेच सदस्यांशी चर्चा केली. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सिंचन प्रश्नावर भर देऊन काम केले जाईल. या कामासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची धूरा स्वीकारल्यानंतर विविध आरोग्य केंद्र, पंचायत समिती यांना आकस्मिक भेटी देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आपल्या अध्यक्ष पदाच्या काळात सिंचन व्यवस्था बळकटीकरणासोबतच शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.