मेळावा, समाधान शिबिरातून योजनांचा प्रसार
By Admin | Updated: January 24, 2016 01:37 IST2016-01-24T01:37:28+5:302016-01-24T01:37:28+5:30
पोलीस ठाणे, देसाईगंजच्या वतीने उसेगाव व भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे जनजागरण मेळावा व समाधान शिबिर आयोजित करून ..

मेळावा, समाधान शिबिरातून योजनांचा प्रसार
लाहेरी, उसेगाव (चक) येथे कार्यक्रमाचे आयोजन : पोलीस व महसूल प्रशासनाचा पुढाकार
देसाईगंज/ लाहेरी : पोलीस ठाणे, देसाईगंजच्या वतीने उसेगाव व भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे जनजागरण मेळावा व समाधान शिबिर आयोजित करून या भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती गुरूवारी देण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
देसाईगंज पोलीस ठाण्याच्या वतीने उसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर गुरूवारी आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून कुरूडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गहाणे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास ढोरे, शिवराजपुरचे सरपंच मारोती बगमारे, पोलीस पाटील नमिता जुमनाके, शालू ंदंडवते उपस्थित होत्या.
मेळाव्यादरम्यान विविध शासकीय विभागांच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. नाट्यकलावंत हिरालाल पेंटर, मारोतराव बुल्ले यांनी लोकनाट्यातून जनजागृती केली. दरम्यान व्हॉलिबॉल, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. संचालन बोदेले, राजू पुराम तर आभार मांडवे यांनी केले.
भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे गुरूवारी समाधान शिबिराचे उद्घाटन भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार अरूण येरचे होते. यावेळी नायब तहसीलदार स्वामी डोंगरे, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी काळबांधे, उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश मेश्राम, महावितरणचे पाटील, पुरवठा निरीक्षक भांडारवार, कृषी विस्तार अधिकारी पदा, सुधाकर तिम्मा, सुरेश सिडाम, लक्ष्मीकांत बोगामी, बाबुराव पिपरे, शामराव येरकलवार, कुमरे, म्हशाखेत्री, घाटे उपस्थित होते. शिबिरात ४९ रहिवासी दाखले, ४७ जन्माचे दाखले, ६३ जमिनीचे दाखले, ९३ शिधापत्रिका, ८४ उत्पन्नाचे दाखले, १ धनादेश, १ स्प्रेपंप, १ इलेक्ट्रिक पंप, ३६ सातबारा, ११८ नमुना ८ अ अशा प्रकारचे विविध दाखले वितरित करून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. १४ रूग्णांची तपासणी करून रुग्णांना औषधीही वितरित करण्यात आली. (वार्ताहर)