सूरजागड प्रकल्पाबाबत कंपनीशी लवकरच घेणार बैठक
By Admin | Updated: April 22, 2016 03:20 IST2016-04-22T03:20:06+5:302016-04-22T03:20:06+5:30
एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले

सूरजागड प्रकल्पाबाबत कंपनीशी लवकरच घेणार बैठक
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर तब्बल १० वर्षानंतर लीज घेतलेल्या कंपन्यांनी उत्खननाचे काम हाती घेतले आहे. करारनाम्यानुसार हे काम थांबविता येणार नाही, उद्या जर कंपनी न्यायालयात गेली तर कायमस्वरूपी हे काम प्रलंबित होऊन जाईल, त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका, येत्या दहा दिवसांत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावून सर्व बाबी समजावून घेतल्या जातील व प्रकल्प जिल्ह्यात उभा करून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे प्रथम काम सरकार करेल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २००७ मध्ये तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने या खासगी कंपन्यांना सूरजागड पहाडीवर लीज मंजूर केली. तब्बल दहा वर्ष या ठिकाणी कोणतेही काम सुरू झाले नाही. आता आमच्या सरकारने या कामाला सुरुवात व्हावी, म्हणून प्रयत्न सुरू केले. ३३ वर्षांपासून या जिल्ह्यात उद्योग आलेला नाही. उद्योगधंदे निर्माण व्हावे, म्हणून आपण पुढाकार घेऊन दिल्लीत बैठक लावली होती. त्यानंतर या कामाला गती आली. आता काम सुरू होण्याची वेळ आली असताना त्यावेळी सत्तेत असलेले लोक आता प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, मोर्च काढत आहेत, प्रकल्प नेमका कुठे होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
गडचिरोली जिल्ह्याच्या विशेषत: एटापल्ली तालुक्यातील तरूणाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, कुशल मनुष्यबळ प्रकल्प उभा राहील त्यावेळपर्यंत निर्माण झाले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. कंपनी जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देण्यास तयार नसेल, तर मी एटापल्ली, हेडरी, सूरजागडच्या जनतेसोबत उभा राहील, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
येत्या दहा दिवसात कंपनीचे अधिकारी, सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन साऱ्या बाबी निश्चित केल्या जातील, जनतेची दिशाभूल करण्याचे काम नेत्यांनी थांबविले पाहिजे व जिल्हा विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकसंघ उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)