समस्यांसंदर्भात महिनाभरात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार
By Admin | Updated: April 6, 2015 01:35 IST2015-04-06T01:35:11+5:302015-04-06T01:35:11+5:30
कुंभार समाजाच्या विकासासाठी मातीकला बोर्ड स्थापन व्हावे, तसेच कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गात समावेश

समस्यांसंदर्भात महिनाभरात मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावणार
कुंभार समाज मेळावा : अम्ब्रीशराव आत्राम यांचे आश्वासन
गडचिरोली : कुंभार समाजाच्या विकासासाठी मातीकला बोर्ड स्थापन व्हावे, तसेच कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गात समावेश होणे गरजेचे आहे. या दोन प्रश्नांसह कुंभार समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न कायम आहेत. कुंभार समाजाच्या समस्यांबाबत राज्यस्तरावर निर्णय होण्यासाठी कुंभार समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महिनाभरात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावणार, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले.
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ जिल्हा गडचिरोलीच्या वतीने लोकप्रतिनिधींचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कुंभार समाज मेळावा संस्कृती भवनात रविवारी घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार, डॉ. सुनंदा जामकर, कल्याण कुंभार, शेषानंद पांडे महाराज, चंद्रकला चिकाणे, सदाशिव व्यवहारे, आशा बोरसरे, एकनाथ बुरबांदे, सुरेश पाठक, देवराव खोबरे, सूर्यभान वरवाडे, अनिल करपे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कुंभार समाज महासंघाच्या वतीने पालकमंत्री आत्राम खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खा. अशोक नेते म्हणाले, कुंभार समाजाच्या ज्वलंत प्रश्नांकडे तत्कालीन राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कुंभार समाज विकासापासून दूर राहिला. कुंभार समाजाचा समावेश एन. टी. प्रवर्गात होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू, असे सांगितले.
याप्रसंगी कुंभार समाजातील इयत्ता दहावीतील व पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पायल संजय रामगुंडेवार, पल्लवी भक्तदास खोबरे, अंकित अशोक बुरबांदे, आशिष दिलीप गुंडरे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार समाज महासंघाचे सरचिटणीस सुभाष तेटवार, संचालन लीलाधर पाठक, किशोर बुरबांदे यांनी केले तर आभार ताराचंद कोटांगले यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते यांना कुंभार समाज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील कुंभार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय रामगुंडेवार, उपाध्यक्ष गोपाळराव खोबरे, दिलीप ठाकरे, किशोर बुरबांदे, नरेंद्र ठाकरे, ताराचंद कोटांगले, रवींद्र गिरोले आदींनी सहकार्य केले.
पालकमंत्र्यांनी दाखविली माणुसकी
गडचिरोली येथे कुंभार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम अहेरीवरून निघाले. दरम्यान आष्टी, चामोर्शी मार्गावर गणेश साळवे व त्यांच्या पत्नीचा दुचाकीने अपघात घडला. पालकमंत्री आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबविला. जखमी झालेल्या गणेश साळवे यांच्या पत्नीला आपल्या वाहनात बसवून आष्टीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. योग्य औषधोपचार करण्याचे निर्देशही तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले. त्यानंतर ते गडचिरोली येथे कुंभार समाजाच्या मेळाव्याला उपस्थित झाले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गेडाम, श्रीनिवास मगडीवार, संजय पाणगुडे आदी उपस्थित होते.
कुंभार समाजाच्या हक्कासाठी व विकासासाठी समाज बांधवांनी संघटीत राहावे, कुंभार समाजातील युवकांना रोजगार देण्याचा निश्चितच प्रयत्न करू.
- अम्ब्रीशराव आत्राम, पालकमंत्री, गडचिरोली