पालकमंत्र्यांची आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी भेट
By Admin | Updated: July 2, 2015 02:06 IST2015-07-02T02:06:34+5:302015-07-02T02:06:34+5:30
धानोरा तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात यावे, या मागणीला ...

पालकमंत्र्यांची आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी भेट
मॉडेल स्कूल बंदचे प्रकरण : चर्चेनंतर विद्यार्थी व पालकांचे आंदोलन मागे
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात यावे, या मागणीला घेऊन मोहली परिसरातील पाच सहा गावातील जवळपास ९६ विद्यार्थी व ३० ते ३५ पालकांनी बुधवारी सकाळी १२ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थी व पालकांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून २ जुलै गुरूवारपासून जिल्ह्यातील पाचही मॉडेल स्कूल सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती आपण संवेदनशील आहो, शासनही आपल्या पाठिशी आहे, ठिय्या आंदोलन करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी आपल्याशी चर्चा करायला पाहिजे होती, चर्चेतून मार्ग काढता आला असता, मात्र तुम्ही काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ठिय्या आंदोलन सुरू केले, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. मॉडेल स्कूलचे विद्यार्थी व पालक तसेच तुमचे निवेदन माझ्यापर्यंत पोहोचले नाही. मंगळवारी आपल्याला मॉडेल स्कूलची समस्या कळली. त्यानंतर आपण तत्काळ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून मॉडेल स्कूल सुरू ठेवण्याची विनंती केली. याला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आता मॉडेल स्कूल सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री आत्राम यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी व पालकांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)