तब्बल चार वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी गायब

By Admin | Updated: August 7, 2016 01:40 IST2016-08-07T01:40:57+5:302016-08-07T01:40:57+5:30

तालुक्यातील वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मेश्राम हे मागील चार वर्षापासून सतत गैरहजर आहेत.

Medical officer missing for four years | तब्बल चार वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी गायब

तब्बल चार वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी गायब

कारवाई शून्य : वडधा परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली
आरमोरी : तालुक्यातील वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ गजानन मेश्राम हे मागील चार वर्षापासून सतत गैरहजर आहेत. एकच डॉक्टर असल्याने वडधा परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. मात्र संबंधित डॉक्टरवर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
गजानन मेश्राम हे वडधा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २०१० मध्ये गट अ च्या वैद्यकीय पदावर रूजू झाले. अवघ्या दीड वर्षानंतर मे २०१२ पासून ते आजपर्यंत प्रशासनाला कोणतीही सूचना न देता परस्पर गैरहजर आहेत. तेव्हापासून सदर डॉक्टर गैरहजर असल्याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला देण्यात आली आहे. तरी सुध्दा या डॉक्टरांवर निलंबनाची कार्यवाही न करता पदाचे स्वरूप जैसेथे ठेवण्यात आले आहे. जवळपास ४० हजार लोकसंख्येच्या रूग्णसेवेचा भार वडधा प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर या आरोग्य केंद्राची सेवा सुरू असून रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. मेश्राम हे गेल्या चार वर्षापासून गैरहजर असताना सुध्दा त्यांच्यावर कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांनी अनेकदा याबाबत सूचना देऊनही सदर डॉक्टरवर कारवाई करण्यात आली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वायरल फिव्हरचा प्रकोप सुरू आहे. वडधा परिसरात गावांमध्ये शेकडो लोक तापाने फणफणत आहेत. येथे डॉक्टरांची कमतरता असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. सदर डॉक्टर चार वर्षापासून सातत्याने गैरहजर असल्याने या संदर्भात शासनाने तत्काळ निर्णय घेणे अपेक्षीत होते. मात्र एकाच डॉक्टराच्या भरवशावर वडधा आरोग्य केंद्राचा कारभार सुरू असून येथील अनेक रूग्ण आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात रेफर केले जात आहेत. (शहर प्रतिनिधी)खासगी सेवेत दाखल
सतत गैरहजर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांनी वणी येथे आपला खासगी दवाखाना सुरू केला असून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मात्र त्यांनी अजूनपर्यंत नोकरीचा राजीनामा दिला नाही.

Web Title: Medical officer missing for four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.