रूग्णालयाचा बायोकचरा जातो चंद्रपुरात
By Admin | Updated: February 24, 2015 02:06 IST2015-02-24T02:06:12+5:302015-02-24T02:06:12+5:30
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दररोज निघणारा बायो

रूग्णालयाचा बायोकचरा जातो चंद्रपुरात
गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दररोज निघणारा बायो मेडिकल वेस्ट तथा जैविक कचरा हा चंद्रपूर येथे पाठवून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात असल्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयाचा कचरा निर्मुलन करण्याचा वेळ सध्या वाचलेला आहे. काही वर्षांपूर्वी हा कचरा जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मागील भागात टाकला जात होता. येथे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रक्रिया करावी लागत होती.
गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात ३०० खाटांची व्यवस्था आहे. रूग्णालयाच्या विविध वार्डात या पेक्षा अधिक रूग्ण उपचारासाठी दाखल असतात. या सर्व रूग्णांवर उपचार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बायोमेडीकल वेस्ट निर्माण होते. याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अनेक शहरांमध्ये रूग्णालयांसाठी डोकेदुखी ठरणारा विषय आहे. गडचिरोलीतही काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. परंतु आता चंद्रपूर येथील सुपर हायजिन कंपनी या खासगी कंपनीला बायो मेडिकल वेस्ट विल्हेवाटीचे काम देण्यात आले आहे. सदर कंपनीकडून दररोज वाहन आणून गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयासह अन्य रूग्णालयातूनही कचरा नेला जात आहे, अशी माहिती मिळाली आहे. प्रत्येक वार्डात चार बकेटमध्ये हा कचरा जमा केला जातो. त्यानंतर त्याची वर्गवारी करून त्याला गडचिरोली येथेच निर्जंतूक केले जाते. त्यानंतर हा कचरा चंद्रपूर येथे पाठविला होता. त्यामुळे सध्या जिल्हा सामान्य रूग्णालयाचा जैविक कचरा निर्मुलनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
तीन वर्षांपासून राबविली जात आहे आॅनलाईन औषधी प्रणाली
४राज्याच्या आरोग्य विभागांनी गेल्या तीन वर्षांपासून औषधी मागणीबाबत आॅनलाईन ही औषधी प्रणाली कार्यान्वित केली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने रूग्णांची संख्या लक्षात घेऊन नेहमी लागणाऱ्या औषधांची वर्षभरासाठी मागणी केली जाते. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून औषध पुरवठा केला जातो. याशिवाय वेळोवेळी लागणाऱ्या औषधांची मागणी आॅनलाईन प्रणालीद्वारे केली जाते. त्यानंतर बस कुरीअरच्या सहाय्याने सदर औषधांचा जिल्हा सामान्य रूग्णालयाला पुरवठा होतो. आरोग्य विभागाचे संचालक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुदबाह्य औषध साठ्याची विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती रूग्णालयाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने विविध कामे सुरू आहेत. यामुळे काही ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे. सदर कामे आटोपल्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाच्या वतीने रूग्णालयाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. रूग्णालय परिसरात बगिचा, मोटार व सायकल पार्कींग व्यवस्था, पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली
रूग्णालयात तीन वॉटर कुलर आहेत. काही नागरिकांनी या वॉटर कुलरच्या तोट्या खराब केल्या. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अनेक कामे सुरू आहेत. त्यामुळे या वॉटर कुलरचा पाणी पुरवठा बंद आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी रूग्णालयात आणखी तीन नवे वॉटर कुलर बसविण्यात येणार आहे. रूग्णालयातील व्यवस्थेबाबत तसेच रूग्णांना चांगल सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही दक्ष आहोत.
- डॉ. अनिल रूडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली