आगीत साहित्य जळाले
By Admin | Updated: February 4, 2016 01:28 IST2016-02-04T01:28:43+5:302016-02-04T01:28:43+5:30
स्थानिक आंबेडकर वॉर्डातील परित्यक्त्या महिला कौशल्या गोवर्धन सिडाम यांच्या झोपडीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत

आगीत साहित्य जळाले
देसाईगंजच्या आंबेडकर वॉर्डातील घटना : तांदळाच्या डब्यात ठेवलेली रक्कमही खाक
देसाईगंज : स्थानिक आंबेडकर वॉर्डातील परित्यक्त्या महिला कौशल्या गोवर्धन सिडाम यांच्या झोपडीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. स्वयंपाकघरात ही आग लागल्याने अन्नधान्यही पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
आंबेडकर वॉर्डात कौशल्य गोवर्धन सिडाम ही परित्यक्त्या महिला आपल्या मुली व नातवंडासोबत झोपडीत राहते. दोन्ही मायलेकी बांबूच्या टोपल्या तयार करून त्या विकण्यासोबत मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालवितात. मंगळवारी देसाईगंज येथे स्थानिक नगराध्यक्षांचे लग्न असल्याने कौशल्या संपूर्ण कुटुुंबासह लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या घरातील स्वयंपाक घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण अन्नधान्य व घरातील कपडेही जळून खाक झाले. शेजाऱ्यांनी समोरचा दरवाजा तोडून घरातील काही सामान काढले. सामान बाहेर काढतपर्यंत बहुतांशी सामान आगीच्या विळख्यात सापडून भस्मसात झाले. रात्री नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला याची सूचना करण्यात आली. त्यांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले.
कौशल्याबाई आपल्या मजुरीची रक्कम चोरीला जाऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात ठेवत होत्या. तीही आगीत स्वाहा झाली आहे. याबाबत तहसीलदार अजय चरडे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासनाकडून निकषानुसार आवश्यक मदत देण्यासंदर्भात कारवाई केली जाईल. (वार्ताहर)