नक्षलग्रस्त भागात प्रचंड मतदान
By Admin | Updated: February 22, 2017 01:52 IST2017-02-22T01:52:08+5:302017-02-22T01:52:08+5:30
अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या

नक्षलग्रस्त भागात प्रचंड मतदान
दुर्गम भागात शांततेत मतदान : दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६६.५ टक्के मतदान
गडचिरोली : अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपले तेव्हा ६६.५ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. अहेरी तालुक्यात ७०.८३ टक्के, सिरोंचा ७३.७९, भामरागड ५७.१९ व एटापल्ली तालुक्यात ६४.१९ टक्के मतदान झाले आहे.
अहेरी तालुक्याच्या गुड्डीगुडम येथे ७९ टक्के मतदान झाले आहे. ९६५ मतदारांपैकी ७५८ मतदारांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. खमनचेरू-नागेपल्ली मतदार संघात तिमरण ग्रामपंचायत अंतर्गत हे मतदान केंद्र येते. तर राजाराम खांदला ग्रामपंचायत अंतर्गत राजाराम-पेरमिली मतदार संघात येणाऱ्या मतदान केंद्रावर ५६३ मतदारांपैकी ६७.५० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिमलगट्टा केंद्र १- ८०.३७, जिमलगट्टा केंद्र २- ७४.३०, गोेविंदगाव ६९.५४, किष्टापूर ६५, अरकापल्ली ७७.७९, रसपल्ली मतदान केंद्रावर ७०.५८ टक्के मतदान झाले.
भामरागड तालुक्यातील लाहेरी व मल्लमपोडूर मतदान केंद्रावरील पोलिंग पार्टीला ईव्हीएम मशीनसहित हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नेण्यात आले.
सिरोंचा तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत ७३.७९ टक्के मतदान झाले. तालुक्यातील २१ हजार ३११ महिला व २२ हजार ६७ पुरूष असे एकूण ४३ हजार ३७८ मतदारांपैकी १५ हजार ४४० महिला व १६ हजार १९२ पुरूष असे एकूण ३१ हजार ६६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ पोलिंग पथकापैकी अमडेल्ली व कोप्पेला या संवेदनशील भागातील दोन पथक झिंगानूर बेस कॅम्पला दुपारी ४.३० वाजेपर्यंत पोहोचले. उर्वरित ७४ पोलिंग पथकांपैकी सिरोंचा २० तर बामणीची दोन अशी २२ पथक संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तालुका मुख्यालयात पोहोचली. दुपारी ३ वाजता निर्धारीत वेळेत मतदान संपताच सशस्त्र पोलीस संरक्षणात पोलिंग पथकांनी बेस कॅम्प गाठले. संरक्षण पथकात महिला शिपायांची संख्याही लक्षणिय होती. तालुक्यात आसरअल्ली केंद्रावरील दोन राजकीय कार्यकर्त्यांना स्थानबध्द करण्यात आले. नंदीगाव मतदान केंद्रावरील क्षुल्लक बाचाबाचीनंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधितांना तंबी दिली. या दोन घटना वगळता कुठेही गोंधळ उडाला नाही. सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर येथे दोन मतदान केंद्रावर अनुक्रमे ७४.५९ व ६१.५३ टक्के मतदान झाले आहे. झिंगानूर ४८/२ या मतदान केंद्रावर ७९५ मतदारांपैकी ५९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३०२ महिला व २९१ पुरूषांचा समावेश आहे. झिंगानूर ४८/३ या मतदान केंद्रावर ५५९ मतदारांपैकी ३४४ मतदारांनी मतदान केले. यात १४६ स्त्रीया व १९८ पुरूष यांचा समावेश आहे. येथे ६१.५३ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात. याबाबत अंदाज लावल्या जात आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी मोठा पक्ष राहिल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर अहेरी भागात आविसं व राकाँ अधिक जागांवर कब्जा करण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
पंचायत समिती गणाच्या ईव्हीएममध्ये बिघाड
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा मतदान केंद्रावर पंचायत समितीची गणाच्या ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड निर्माण झाल्याने दीड तास उशीराने मतदान सुरू झाले. येथील जिल्हा परिषद शाळेत भाग १ व भाग २ अशा दोन ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी मशीन ठेवण्यात आले ,त्यात भाग २ मधील पंचायत समिती गणाची मशीन पहिलाच मतदार मतदानासाठी गेला. तेव्हा त्याला मतदान करता आले नाही. त्यामुळे ती नादुरूस्त मशीन बदलविण्यात आली व दीड तास उशीराने मतदान सुरू झाले.