घरकुलांच्या फाईल झाल्या गहाळ
By Admin | Updated: March 20, 2015 01:23 IST2015-03-20T01:23:03+5:302015-03-20T01:23:03+5:30
जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांनी अहेरी पंचायत समितीला भेट दिली असता,

घरकुलांच्या फाईल झाल्या गहाळ
अहेरी : जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांनी अहेरी पंचायत समितीला भेट दिली असता, पंचायत समितीमधील घरकुलांच्या फाईल गहाळ झाल्या असल्याची गंभीर बाब पं. स. च्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली.
अहेरी पंचायत समितीतील भोंगळ कारभार मागील काही दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. कृषी सभापतींनी पं. स. कार्यालयाला भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली. घरकुलाचा अंतिम हप्ता मिळाला नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा तक्रार करूनही हातपंप दुरूस्त करण्यात आले नाही. तसेच बीडीओ लोकप्रतिनिधींशी उद्धट वागत असल्याची तक्रार उपसभापती सोनाली कंकडालवार यांनी केली. याला आत्माराम गद्देकर, यमुना आत्राम यांनी दुजोरा दिला. यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन कंकडालवार यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)