दहाव्या दिवशी उघडली बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:27+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे.

दहाव्या दिवशी उघडली बाजारपेठ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरचीतील नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरचीवासीयांनी तब्बल नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. नऊ दिवस चांगला प्रतिसाद मिळाला व सोमवारी १० व्या दिवशी कोरचीतील संपूर्ण बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरची शहरातील सर्व व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक हनुमान मंदिरात २३ सप्टेंबरला झाली. त्यामध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर असे नऊ दिवस कोरची शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनता कर्फ्यू संपल्यानंतर आता पूर्ववत स्थिती झाली आहे. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम ठरविले असताना बाहेरगावाहून अपडाऊन करणारे अनेकजण नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले. शहरातील नागरिकांनी अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच चार दिवसांपूर्वी व्यापारी संघटनांची बैठकही झाली होती. यामध्ये बाहेर गावातील व्यापारी कोरची शहरात येऊन काही ठिकाणी चारचाकी वाहनातून किराणा व भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले होते. यावर व्यापारी संघटनेने कडक निर्बंध लाऊन बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांना हाकलून लावण्यात आले. त्यानंतर बाहेरून येणारे व्यापारी बंद झाले. अशा स्थितीतही कोरची येथील नागरिकांनी जनता कर्फ्यू यशस्वी केला. आता बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.
गर्दी टाळून नियमांचे पालन करा-तहसीलदार
कोरची शहरात नऊ दिवसानंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली. परंतु वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. ग्रामीण भागातूनही अनेक नागरिक दाखल झाले. कोरोना विषाणूचे संकट कायम असताना नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवावे. तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. तेव्हाच नऊ दिवस ठेवलेल्या जनता कर्फ्यूचे महत्त्व राहिल. गर्दी टाळून नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार व आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांना केले आहे.