बाजारपेठ बंदचा ग्राहकांना फटका
By Admin | Updated: September 14, 2015 01:17 IST2015-09-14T01:17:22+5:302015-09-14T01:17:22+5:30
तान्हा पोळ्याचे निमित्त साधून गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद होती. त्याचबरोबर खासगी वाहतूकही ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

बाजारपेठ बंदचा ग्राहकांना फटका
गडचिरोली : तान्हा पोळ्याचे निमित्त साधून गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद होती. त्याचबरोबर खासगी वाहतूकही ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले.
तान्हा पोळा उत्सव संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाता. बैलांच्या पोळ्याला ग्रामीण भागात तर तान्हा पोळ्याला शहरात विशेष महत्त्व आहे. तान्हा पोळ्यानिमित्त बाजारपेठ बंद ठेवण्याचे शासनाचे कोणतेही आदेश नाही. किंवा व्यापारी संघटनेचा निर्णय नाही. मात्र परंपरेप्रमाणे गडचिरोली शहरातील व्यापारी तान्हा पोळ्याच्या दिवशी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवतात. त्याचबरोबर चहाटपरी, पानठेले सुध्दा बंद ठेवण्यात आले होते. परिणामी शहरात कर्फ्यू लागल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती.
तान्हा पोळ्यानिमित्त खासगी वाहतूक पूर्णपणे बंद राहते. एवढेच नाही तर शहरातील आॅटोरिक्षा सुध्दा बंद होत्या. या दिवशी एसटीला जास्त प्रवासी मिळत नाही. याचा अनुभव एसटी प्रशासनाला असल्याने बहुतांश बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. चालक व वाहकही सुटी घेत असल्याने आगारात वाहक व चालकांची शोधाशोध सुरू असल्याचे दिसून येत होते. रविवारचा बाजार शुक्रवारी भरविण्यात आला. दैनंदिन गुजरीही बंद होती. सर्वच बाजारपेठ बंद असल्याने याचा फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागला. प्रवाशीही बसथांब्यावर ताटकळत बसले होते. (नगर प्रतिनिधी)