गरम कपड्यांनी बाजारपेठ फुल्ल
By Admin | Updated: November 15, 2015 00:58 IST2015-11-15T00:58:22+5:302015-11-15T00:58:22+5:30
दरवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यात थंडीला उशिराने सुरू झाली असली तरी थंडीपासून बचाव करण्याकरिता

गरम कपड्यांनी बाजारपेठ फुल्ल
विविध प्रकारचे कपडे : वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
गडचिरोली : दरवर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यात थंडीला उशिराने सुरू झाली असली तरी थंडीपासून बचाव करण्याकरिता वापरावयाच्या विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून ग्राहक येत असल्याने जिल्हा मुख्यालयातील अनेक तात्पुरत्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मुख्य चौकातील मार्गांवर अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने बाजारपेठेचे स्वरूप आले आहे.
दिवाळीनंतर आता थंडीचा जोर वाढत चालला आहे. थंडीपासून संरक्षण म्हणून ऊबदार कपड्यांना मोठी मागणी असते. हिवाळ्यातील ऊबदार कपडे आणि विविध प्रकारच्या आधुनिक स्वेटरच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक सरसावले असल्याचे दिसून येते. स्थानिक शहरात अनेक ठिकाणी आणि खास करुन बाजार चौक ते गांधी चौक रस्त्याचा दरम्यान विविध प्रकारच्या स्वेटरची दुकाने सजली आहेत.
गडचिरोली येथे पंजाबमधील लुधियाना येथून गरम कपड्यांची आवक केली जात आहे. याकामी चार-पाच व्यावसायिक असून जवळपास अनेकांना त्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. खरेदीसाठी तरुणाई महाग व फॅशनेबल कपड्यांना पसंती देताना दिसत आहेत. तरुणाई एकत्रितपणे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानेही फुललेली दिसतात. शहरातील थंडीत वाढ झाल्यामुळे बाजारात लोकरीच्या ऊबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. लहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाईनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. जेन्ट्स, लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, लेस्कोटी, स्वेटकोटी, कुर्तापॅटर्न, सलवार सुट, जॅकेट, टी-शर्ट, जेन्ट्स मास्क फॅन्सी स्वेटर, हॅन्ड ग्लोव्हज, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, टोपी, कॅप्स अशा वस्तूंना मागणी आहे. यासह विविध प्रकारची कपडे तसेच बालकांसाठी खास गरम कपडे बाजारात गर्दी करून आहेत. ३० रूपयांपासून जवळपास पाच हजार रूपयांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. १५०, २००, २५०, ५०० रूपयापर्यंतच्या माफक दरातही योग्य वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळ्याचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची मुलांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खरेदी केली जात आहे. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे.
आपल्या ड्रेसप्रमाणे आपला थंडीचा पेहराव असावा, असे महिलांना वाटते.
महिलांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, स्वेटर शर्ट, जॅकेट्स, हातमोजे, पायमोजे, स्टोल्स, कानपट्टी बाजारात आल्या आहेत. विविध डिझाईन व रंगामधील विविध प्रकारच्या सुट्सना महिलांकडून पसंती मिळत आहे, असे व्यावसायिक सुरेश डोंगरवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)