गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या तरुणांवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:55 IST2019-09-11T15:54:26+5:302019-09-11T15:55:18+5:30
आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर नक्षल्यांनीच गोळीबार करीत त्यातील एकाला ठार तर दुसऱ्याला जखमी केल्याची घटना एटापल्ली येथे मंगळवारी घडली.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या तरुणांवर गोळीबार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर नक्षल्यांनीच गोळीबार करीत त्यातील एकाला ठार तर दुसऱ्याला जखमी केल्याची घटना एटापल्ली येथे मंगळवारी घडली.
किशोर उर्फ मधुकर मट्टामी (३२) असे ठार झालेल्या तर अशोक होळी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अशोक होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याने २०१० मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. किशोर उर्फ मधुकर पेका मट्टामी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक ४ व १० मध्ये कार्यरत होता. त्याने २०१३ मध्ये आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर दोघेही गडचिरोलीत राहत होते. दोघेही अधूनमधून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपापल्या गावी जात होते.
९ सप्टेंबरला दोघेही आपल्या गावी गेले होते. १० सप्टेंबरला किशोर मट्टामी हा अशोक होळीच्या गावी गेला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलने गडचिरोलीकडे येण्यास निघाले. दरम्यान गिलनगुडा गावानजीक नक्षल्यांनी दोघांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यात अशोक होळी जखमी झाला. त्याने नक्षल्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करीत गट्टा(जांभिया) पोलिस मदत केंद्र गाठले. पोलिसांनी त्यास हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, किशोर उर्फ मधुकर मट्टामी हा नक्षल्यांच्या तावडीत सापडला. नक्षल्यांनी त्यास गोळ्या घालून ठार केले.
या घटनेमुळे नक्षल्यांचा क्रूर चेहरा जगापुढे आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.