गडचिरोली जिल्ह्यात महिला व विद्यार्थिनींनी जाळले नक्षली बॅनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:59 IST2020-03-03T19:56:44+5:302020-03-03T19:59:55+5:30
गडचिरोली जिल्ह्यात महिला व विद्यार्थिनींनी पोलिसांच्या मदतीने बॅनर हटवून नक्षलवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.

गडचिरोली जिल्ह्यात महिला व विद्यार्थिनींनी जाळले नक्षली बॅनर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली ते भामरागड मार्गावरील ताडगावलगत मंगळवारी पहाटे नक्षलवाद्यांनी रस्त्यावर बॅनर बांधून ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यासंबंधीचे आवाहन केले होते. याशिवाय रस्त्यावरच बॅनरने झाकून भूसुरूंगसदृश डबे ठेवल्यामुळे दहशत पसरून वाहतूक ठप्प झाली होती. परंतू नंतर पोलिसांच्या मदतीने ते बॅनर हटवून महिला व विद्यार्थिनींनी बॅनर जाळत नक्षलवाद्यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.
नक्षलवादी एकीकडे याच तालुक्यातील इरपनार गावातील बेबी मडावी या युवतीचा निर्घृण खून करतात आणि दुसरीकडे महिला दिन साजरा करण्याच्या नावावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात, हे खपवून घेतले जाणार नाही. नक्षलवाद्यांनी अल्पवयीन मुलींचा देशविघातक कृत्यांसाठी वापर थांबवावा, बेबी मडावी जिंदाबाद, नक्षलवादी मुर्दाबाद, असे नारेही यावेळी विद्यार्थिनींनी दिले.
आतापर्यंत केले २२ महिलांचे खून
नक्षलवाद्यांनी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील २२ निरपराध महिलांचे खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताडगाव पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींनी नक्षलवाद्यांचा निषेध करीत दाखविलेल्या धाडसाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले.