अनेक पंचायत समित्या त्रिशंकू
By Admin | Updated: February 24, 2017 00:56 IST2017-02-24T00:56:11+5:302017-02-24T00:56:11+5:30
देसाईगंज, चामोर्शी पंचायत समितीला भाजपला तर कुरखेडा, आरमोरी पं.स.त काँग्रेसला स्पष्ट बहूमत मिळाले आहे.

अनेक पंचायत समित्या त्रिशंकू
देसाईगंज, चामोर्शी, धानोरात भाजपच : कुरखेडा, आरमोरीत काँग्रेस तर अहेरीत आविसंला स्पष्ट बहुमत
गडचिरोली : देसाईगंज, चामोर्शी पंचायत समितीला भाजपला तर कुरखेडा, आरमोरी पं.स.त काँग्रेसला स्पष्ट बहूमत मिळाले आहे. अहेरी पंचायत समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. भाजपने अनेक पंचायत समित्यांवर गेल्यावेळपेक्षा अधिक जागा मिळविल्या आहे. अनेक पंचायत समित्या काँग्रेसने आपल्याकडे कायम राखल्या असून सभापती पदाचे आरक्षित उमेदवार ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे सत्तेचा मापदंड झुकेल.
कोरची पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता काँग्रेसला कोटगूल, कोटरा या दोन जागा मिळाल्या असून बेडगावची जागा शिवसेनेने तर बेतकाठीची जागा भारतीय जनता पक्षाने राखली आहे. येथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. मात्र त्यांना सत्ता स्थापन कराययाठी शिवसेना किंवा भाजपची मदत घ्यावी लागणार आहे.
कुरखेडा पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहूमत मिळाले आहे. १० पैकी सहा जागा काँग्रेसने मिळविल्या असून तीन जागांवर भाजप व एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
देसाईगंज पंचायत समितीत सहा पैकी सहा जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहे.
आरमोरी पंचायत समितीत काँग्रेसला बहूमत मिळाले आहे. आठ पैकी चार जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर भाजपला तीन, शिवसेनेला एक जागा मिळाली आहे.
गडचिरोली पंचायत समितीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहे. तर अपक्षांनी दोन जागांवर विजयी मिळविला आहे. अपक्षांच्या मदतीने येथे काँग्रेस सहजपणे सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चामोर्शी पंचायत समितीवर भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. येथे १८ पैकी १३ जागा भाजपला मिळाल्या असून काँग्रेसला दोन, शिवसेनेला एक व अतुल गण्यारपवार यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या आहे.
धानोरा पंचायत समितीत काँग्रेस व भाजपला प्रत्येकी चार-चार जागा मिळाल्या आहे. त्यामुळे येथे त्रिशंकू परिस्थिती आहे.
एटापल्ली पंचायत समितीही त्रिशंकू आली असून आठ पैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, दोन जागा आविसंला, एक जागा भाजपला, एक जागा काँग्रेस व एक जागा अपक्षांना मिळाली आहे. येथे काँग्रेस, राकाँ, अपक्ष मिळून सत्ता स्थापन करू शकतात.
भामरागड पंचायत समितीच्या चार जागांपैकी तीन जागा अपक्षांनी जिंकल्या आहे. एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
सिरोंचा पंचायत समितीत भाजपला तीन, राकाँला तीन व आविसंला दोन जागा मिळाल्या आहे. आठ सदस्य संख्या असलेल्या या पंचायत समितीत कुणालाही बहुमत मिळालेले नाही. त्यावर आविस सदस्यांवरच या पंचायत समिती सत्ता अवलंबून राहणार आहे.
मुलचेरा पंचायत समितीत भाजपला दोन, राकाँला दोन व काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहे. येथे काँग्रेस, राकाँ एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकते.अहेरी पंचायत समितीवर आदिवासी विद्यार्थी संघाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर आविसंला सहा जागा मिळाल्या आहे.