अनेक महाविद्यालयांना लागले टाळे
By Admin | Updated: April 1, 2015 01:31 IST2015-04-01T01:31:32+5:302015-04-01T01:31:32+5:30
गडचिरोली जिल्ह्यात २५ कोटी रूपयाच्या अफरातफरीचा शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आल्यानंतर एमएसबीटीई, राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धा ...

अनेक महाविद्यालयांना लागले टाळे
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २५ कोटी रूपयाच्या अफरातफरीचा शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आल्यानंतर एमएसबीटीई, राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धा आदींचे अभ्यासक्रम चालविण्यासाठी निर्माण झालेल्या अनेक महाविद्यालयांना टाळे लागले असून या संस्थांनी आपला पसारा आता आगुटला आहे.
या संस्था शहरातून व ग्रामीण भागातूनही बेपत्ता झाल्या असून अनेकांनी जुना रेकॉर्ड आपल्या व इतरांच्या घरी नेऊन ठेवला आहे. २०१० पासून गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा, अहेरी, आलापल्ली, आष्टी आदी भागात मोठ्या प्रमाणावर खासगी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू झाल्या होत्या. या संस्थांनी आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यवधी हडपले. मागील चार ते पाच वर्षांपासून हा धडक कार्यक्रम सुरू होता. परंतु डिसेंबर २०१४ मध्ये आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी या सर्व बाबीचा सखोल तपास केल्यानंतर चार ते पाच संस्थांविरूध्द पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या संस्था जिल्ह्यातून पसार होण्यास सुरूवात झाली. १० बाय १० च्या खोलीत फलक लावून चालणारे हे महाविद्यालय रातोरात बेपत्ता झाले. या प्रकरणाचा तपास गडचिरोली पोलीस दलाचे विशेष पथक पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आतापर्यंत १७ वर अधिक संस्थाचालक, अधिकारी, लिपीक आदींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजुनही अनेक संस्थाचालक न्यायालयाच्या जामिनावर फिरत आहेत. काहींनी उच्च न्यायालयात तर काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व संस्थाचालकांनी गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात कोट्यवधी रूपयाचा शासकीय तिजोरीवर डल्ला मारला. यातून करोडो रूपयांची संपत्ती या संस्थाचालकांनी मागील दोन ते तीन वर्षात जमा केली आहे. काहींनी देवस्थानांनाही देणग्या देऊन येथे खोल्या बांधून दिल्या, अशी माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. एकूणच या प्रकरणातील सर्व आरोपींची संपत्ती शासन जमा करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. या सर्व आरोपींविरोधात जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. (प्रतिनिधी)