वादळी पावसाने आंब्याचा माेहर गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST2021-02-21T05:09:06+5:302021-02-21T05:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क महागाव (बु.) : अहेरी तालुक्यात आंबा लागवडीचे क्षेत्र ५० हेक्टर इतके असून, आंब्याला माेठ्या प्रमाणात माेहर ...

वादळी पावसाने आंब्याचा माेहर गळाला
लाेकमत न्यूज नेटवर्क
महागाव (बु.) : अहेरी तालुक्यात आंबा लागवडीचे क्षेत्र ५० हेक्टर इतके असून, आंब्याला माेठ्या प्रमाणात माेहर आला हाेता. परिणामी यावर्षी आंब्याचे भरघाेस उत्पादन येणार, अशी शक्यता उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हाेती. मात्र गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी वादळी पावसाने मोहर गळून पडला.
यावर्षी आंब्याची झाडे माेहराने व फुलांनी बहरली हाेती. चांगल्या वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची आशा बळावली हाेती. महागाव बुज परिसरासह अहेरी तालुक्यात आंबा झाडांची संख्या माेठी आहे. या ठिकाणी खूप जुनी झाडे आहेत. गावठी आंब्याची चव या भागातील नागरिकांना दरवर्षी चाखायला मिळते. मात्र यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली. गुरुवारी अचानक ४ च्या सुमारास महागाव बुज परिसरात अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने आंब्याचा माेहर गळून पडला. रिमझिम पाऊसही सुरू हाेता. अशा वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने आंबा उत्पादक शेतकऱ्यांची घाेर निराशा केली आहे.
टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचेही अवकाळी वादळी पावसाने नुकसान झाले. पिकलेला टोमॅटो फुटून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.