शंकरनगरात फुलली मक्याची शेती

By Admin | Updated: February 20, 2017 00:38 IST2017-02-20T00:38:57+5:302017-02-20T00:38:57+5:30

जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे.

Mango cultivation of Shankarnagar | शंकरनगरात फुलली मक्याची शेती

शंकरनगरात फुलली मक्याची शेती

७० हेक्टर क्षेत्रावर लागवड : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
भिमराव मेश्राम जोगीसाखरा
जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे. त्याचबरोबर रबी हंगामात भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल ते मे पर्यंत रोजगार उपलब्ध होणार असून लाखो रूपयांचे उत्पन्नही मिळण्यास मदत होणार आहे. शंकरनगर येथील शेतकऱ्यांची शेती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
जोगीसाखरापासून तीन किमी अंतरावर १९६५ मध्ये शंकरनगर हे गाव वसविण्यात आले. या गावात एकूण १२३ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावातील नागरिक बांगला देशातील निर्वासीत असल्याने त्यांना शासनाकडून प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कुटुंब वाढल्याने जमिनीचे तुकडे पडले. तरीही बंगाली समाजातील हा शेतकरी कधीच मागे हटला नाही. या शेतकऱ्यांनी स्वत:च्या मेहनतीने शेतात विहीर खोदली आहे. या विहिरीच्या माध्यमातून दरवर्षी विविध हंगामात विविध प्रकारची पिके हा शेतकरी घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मका पिकासाठी चांगले असल्याने भरघोस उत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून रबी हंगामात मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली. यावर्षी सुमारे ७० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. हिरवेगार मक्याची पिक या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मका पिकाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचा बहाणा करीत बहुतांश शेतकरी खरीपातील धानाव्यतिरिक्त इतर कोणतेच पीक घेत नाही. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. मात्र शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी हे कारण कधीचेच नाकारले आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून सिंचन करून रबी तसेच उन्हाळी पिकांचेही ते उत्पादन घेत आहेत.

फळांचेही उत्पादन वाढले
शंकरनगर येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. मक्याबरोबरच येथील शेतकरी कारले, चवळी, टमाटर, वांगे, आलू यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. शेतातील पारीवर आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. यातूनही येथील शेतकऱ्यांना बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास मदत होते, अशी माहिती पुरंजन मंडल या शेतकऱ्याने दिली.

शेतीमध्ये राबताना नशीबाला दोष न देताना आम्ही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. शंकरनगर येथे पिकणारा दर्जेदार भाजीपाला, फळे, मका, आंबा नागपूर येथील बाजारपेठेत पाठविला जात आहे. मात्र कृषी विभागाचे आमच्या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीविषयची नवीन माहिती कृषी विभाग आपल्याला देत नाही. शेती हा व्यवसाय आहे. तो सर्व कुटुंबांनी मिळून चालवायचा आहे. जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी पाणी,खत वेळेवर द्यावे लागते.
- सुप्रीया सुपेन बाला, शेतकरी, शंकरनगर

Web Title: Mango cultivation of Shankarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.