व्यवस्थापकच सांभाळतो बँकेचा कारभार
By Admin | Updated: September 13, 2015 01:28 IST2015-09-13T01:28:58+5:302015-09-13T01:28:58+5:30
तालुक्यातील पोटेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार केवळ शाखा व्यवस्थापकच सांभाळत आहेत. त्यामुळे काम होण्यास विलंब होत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत.

व्यवस्थापकच सांभाळतो बँकेचा कारभार
पोटेगाव बँकेतील परिस्थिती : रिक्त पदे भरण्याची मागणी
गडचिरोली : तालुक्यातील पोटेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार केवळ शाखा व्यवस्थापकच सांभाळत आहेत. त्यामुळे काम होण्यास विलंब होत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी लिपिकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
गडचिरोली तालुकास्थळापासून ३० किमी अंतरावर असलेल्या पोटेगाव येथे २६ फेब्रुवारी २०११ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरू करण्यात आली. त्यावेळी रोखपाल, व्यवस्थापक, लिपीक व शिपाई असे चार पदे भरण्यात आली होती. ही सर्व पदे मागील तीन वर्ष कार्यरत होती. एक आठवड्यापूर्वी रोखपाल पद कमी करून रोखपाल एन. जे. वाळके यांचे स्थानांतरण गडचिरोली येथे करण्यात आले. त्यामुळे शाखाव्यवस्थापक व्ही. के. काळबांधे यांच्यावर संपूर्ण बँकव्यवहारांची जबाबदारी आली आहे. शिपाई म्हणून जी.जी. कत्रोजवार कार्यरत आहेत.
पोटेगाव बँकेशी ४० गावे जोडलेली आहेत. बँकेत सुमारे २ हजार ९४३ खातेदार आहेत. प्रत्येक दिवशी सरासरी एक लाखाच्या जवळपास आर्थिक व्यवहार होतात. निराधार नागरिकांची खाते याच बँकेत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी व कर्मचारी याच बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करतात. एकाच कर्मचाऱ्याला सर्व कार्यभार सांभाळावा लागत असल्याने कामे होण्यास विलंंब होत आहे. कित्येक तास ग्राहकांना बँकेत बसून राहावे लागते. ग्राहकांचे व्यवहार व बँकेची नियमीत कामे यामुळे कार्यरत व्यवस्थापकाची तारांबळ उडत आहे. त्यामुळे या ठिकाणी रिक्त पदे भरावी, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)