व्यवस्थापनाच्या मतभेदामुळे वेतन रखडले
By Admin | Updated: February 28, 2017 00:47 IST2017-02-28T00:47:30+5:302017-02-28T00:47:30+5:30
गडचिरोली नजीकच्या नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थायी प्राध्यापक व शिक्षकेत्तर ...

व्यवस्थापनाच्या मतभेदामुळे वेतन रखडले
शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा ऐरणीवर : प्राध्यापक पाचव्या दिवशीही संपावर
गडचिरोली : गडचिरोली नजीकच्या नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थायी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यापासूनचे वेतन व्यवस्थापनाच्या आपसी मतभेदामुळे रखडले आहे, अशी माहिती या महाविद्यालयाच्या अन्यायग्रस्त प्राध्यापकांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. २२ फेब्रुवारीपासून वेतन मिळण्याच्या मागणीसाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप करीत महाविद्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
पत्रकार परिषदेत प्रा. रागिनी पाटील व इतर प्राध्यापकांनी सांगितले की, या महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे गेल्या १० महिन्यांपासूनचे वेतन थकीत आहे. बँकेच्या चार महिन्याच्या ओडी मॅनेजमेंटने कर्मचाऱ्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या आहेत. एकूण १४ महिन्यांचे वेतन देण्यासाठी संस्थेकडे पैसे नाहीत. १८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे हप्ते अदा करण्यात आले नाही. आम्ही कर्मचारी कुठपर्यंत बिनपगारी काम करीत राहणार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कर्जाचे हप्ते व दैनंदिन गरजा कसे पूर्ण करणार, असा सवाल पाटील यांनी संस्थेला केला. वेतनाअभावी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मानसिक व आर्थिक हाल होत आहेत. शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे प्राध्यापकांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांचे पूर्ण प्रवेश होऊनही कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही. पूर्वी संस्थेच्या चंद्रपूर येथील कॉलेजमधून गडचिरोलीच्या कॉलेजच्या खर्चासाठी पैसे येत होते. मात्र आता पैसे येणे बंद झाले आहे. आम्ही ५३ कर्मचारी स्थायी असून २५ अनियमित कर्मचारी आहेत. संस्थेला वेतन व इतर बाबींपोटी दोन कोटी रूपयाचे देणे आहे. तर कॉलेजला दीड कोटीची रक्कम येणे आहे. कॉलेजचा वार्षिक खर्च तीन कोटींचा आहे. संस्थेतील संचालकांच्या आपसी मतभेदामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाचे लक्ष नाही, असा आरोप पत्रकार परिषदेत केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्जाचे हप्ते कपात करण्यात आले. मात्र ही रक्कम बँकेत जमा झाली नाही. भविष्य निर्वाह निधीच्या हप्त्याची रक्कम, कर्मचारी सोसायटीचे लाखो रूपये प्रलंबित आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
विद्यार्थी येतात आणि परततात
नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थायी प्राध्यापकांनी संप पुकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय अस्थायी असलेल्या २५ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्यात आले आहे. प्राध्यापकांअभावी तासिका होत नसल्याने काही विद्यार्थी येतात व घरी परततात. विद्यार्थ्यांअभावी सदर कॉलेज ओस पडल्याचे सद्य:स्थितीत दिसून येत आहे.
दोन शाखा बंद : विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्याने सदर महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक्स व कॉम्प्युटर सायन्स या दोन शाखा बंद झाल्या असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली आहे. अभियांत्रिकी शिक्षणाबाबत फारशी जनजागृती नसल्याने विद्यार्थ्यांचा कल कमी आहे.
नामदेराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जुने ५० लाख व त्यानंतरचे दीड कोटी असे एकूण दोन कोटी रूपये शिष्यवृत्तीची रक्कम समाज कल्याण विभाग व शासनाकडे प्रलंबित आहे. सदर रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यावर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात येईल. सदर महाविद्यालयाचा आर्थिक प्रश्न लवकरच मार्गी लागेल.
- बलबिरसिंग आर. गुरोन, प्रभारी प्राचार्य, नामदेवराव पोरेड्डीवार अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली