कोरचीत मलेरिया रोगाचे थैमान कायमच
By Admin | Updated: November 16, 2015 01:20 IST2015-11-16T01:20:09+5:302015-11-16T01:20:09+5:30
गेल्या आठवडाभरापासून कोरची तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून प्रत्येक गावात घरोघरी रूग्ण तापाने फणफणत आहेत.

कोरचीत मलेरिया रोगाचे थैमान कायमच
८९ रूग्ण पॉझिटिव्ह : पाच दिवसांत
कोरची : गेल्या आठवडाभरापासून कोरची तालुक्यात मलेरिया रोगाने थैमान घातले असून प्रत्येक गावात घरोघरी रूग्ण तापाने फणफणत आहेत. ११ नोव्हेंबरपासून १५ नोव्हेंबर रविवारपर्यंत कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात ८९ मलेरिया पॉझिटिव्ह रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. रविवारी पाच रूग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळले. येथे भयावह स्थिती असतानाही जिल्हास्तरावरून आरोग्य विभागाचे एकही अधिकारी कोरचीच्या रूग्णालयाला भेट देऊन स्थिती जाणून घेतली नाही. यामुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात ११ नोव्हेंबरला १२, १२ नोव्हेंबर १५, १३ नोव्हेंबरला ३०, १४ नोव्हेंबरला ५ असे एकूण ८९ मलेरिया पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. रविवारी दाखल झालेल्या मलेरिया पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये श्वेता सहारे, धनंजय काटेंगे, मोची नरेटी, सैजा कल्लो, सरजुबाई नरोटी आदींचा समावेश आहे. केवळ तीस खाटांची व्यवस्था असलेल्या कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात अनेक रूग्णांना खाली झोपून उपचार घ्यावा लागत आहे. याशिवाय इतर रोगांचेही अनेक रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात दाखल आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत कोरचीच्या ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत आहे. कोरची तालुक्यात मलेरियाची साथ आल्यामुळे दुर्गम भागातील नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)