कोरची तालुक्यात मलेरियाने विद्यार्थिनीचा मृत्यू
By Admin | Updated: December 6, 2015 01:32 IST2015-12-06T01:32:39+5:302015-12-06T01:32:39+5:30
कोरची तालुक्यात मलेरियाचे मोठ्या प्रमाणावर थैमान पसरले आहे. शनिवारी सकाळी कोरची ग्रामीण रूग्णालयात १२ वर्षीय लोमेश्वर बल्लुराम हिचामी रा. हुडपदुमा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

कोरची तालुक्यात मलेरियाने विद्यार्थिनीचा मृत्यू
३६० पॉझिटिव्ह रूग्ण : ग्रामीण रूग्णालयात एकच डॉक्टर
कोरची : कोरची तालुक्यात मलेरियाचे मोठ्या प्रमाणावर थैमान पसरले आहे. शनिवारी सकाळी कोरची ग्रामीण रूग्णालयात १२ वर्षीय लोमेश्वर बल्लुराम हिचामी रा. हुडपदुमा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात मलेरियाचे ३६० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असताना ग्रामीण रूग्णालयात मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांवर उपचार करण्यात प्रचंड अनागोंदी होत आहे.
कोरची तालुक्यातील हुडपदुमा येथील बल्लुराम हिचामी यांच्या पत्नी मागील पाच दिवसांपासून कोरची ग्रामीण रूग्णालयात मलेरियाने रूग्णाने ग्रस्त असल्याने दाखल झाल्या होत्या. त्यांची मुलगी लोमेश्वरीचीही प्रकृती बिघडल्याने तिला शनिवारी सकाळी ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथे केवळ एक बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
लोमेश्वरीला रूग्णालयात दाखल करताच १० ते १५ मिनिटात तिचा मृत्यू झाला. तिच्यावर डॉक्टरांना उपचार करणेही जमले नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शी यांनी केला आहे. नागपूर विभागाचे सहायक आरोग्य संचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या निर्देशानंतर या आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी देण्यात येतील, असे सांगितले होते. परंतु अद्यापही येथे एकही वैद्यकीय अधिकारी रूजू झालेला नाही. ३६० वर अधिक मलेरिया पीडित रूग्ण येथे दाखल आहेत.
रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांच्यावरही उपचार होण्यास प्रचंड अडचण होत आहे. मृतक लोमेश्वरी ही बेतकाठी येथील धनंजय स्मृती विद्यालयात पाचव्या वर्गात शिकत होती, अशी माहिती मिळाली आहे. (शहर प्रतिनिधी)